राष्ट्रपतींच्या उपस्थितीत 3 सप्टेंबरला उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
महाराष्ट्र विधान परिषदेच्या शतक महोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन विधान मंडळाकडून करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत मंगळवार, 3 सप्टेंबर रोजी विधान भवन मुंबई येथे ‘वरिष्ठ सभागृहाची आवश्यकता आणि महत्त्व’ या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. तसेच उत्कृष्ट संसदपटू व सर्वोत्कृष्ट भाषण या पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात येणार आहे.
होर्डिंग पॉलिसीवरील हरकती-सूचनेस मुदतवाढ
मुंबई महापालिकेने होर्डिंग पॉलिसीबाबत जाहीर केलेल्या धोरणावर हरकती-सूचना मागवल्या असून त्या दाखल करण्यासाठी दिलेली 26 ऑगस्टपर्यंतची मुदत वाढवून 9 सप्टेंबरपर्यंत करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेने तयार केलेल्या होर्डिंग पॉलिसी धोरणावर गेल्या 15 दिवसांमध्ये केवळ 53 हरकती-सूचना आल्या आहेत. विविध संस्था, आस्थापने, व्यक्तींनी या दाखल केल्या आहेत. जाहिरात फलकांमधून मिळणाऱ्या महसुलातील 50 टक्के भाग मुंबई महापालिकेला देण्याची अट या नव्या धोरणात नव्याने घालण्यात आली आहे.