अरे, याला येड लागलंय काय… म्हणे पाकिस्तान युद्धास तयार!

4107

जम्मू-कश्मीरातील 370 कलम हटविल्यापासून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान रोज काही ना काही बरळत आहेत. आज तर त्यांनी हिंदुस्थानविरुद्ध युद्धास तयार आहोत, अशी दर्पोक्ती केली आहे. खरोखरच इम्रान यांना येड लागलंय काय, अशी शंका आता उपस्थितीत होत आहे.

पाकिस्तानच्या स्वातंत्र्यदिनी आज इम्रान खान यांनी पाकव्याप्त कश्मीरात मुजफ्फराबाद येथे विधानसभेत भाषण केले. यावेळी त्यांनी पुन्हा गरळ ओकली.

इम्रान खान काय बरळले?
– जम्मू-कश्मीरचा विशेष दर्जा हटवून हिंदुस्थानचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी चूक केली आहे. कश्मीर प्रश्न आंतरराष्ट्रीय केला आहे.
– पंतप्रधान मोदी आणि भाजपचे वास्तव मी जगासमोर मांडले आहे. भाजप आणि संघाची विचारधारा मुस्लिमविरोधी आहे.
– हिंदुस्थान आता कश्मीरच्या मुद्दय़ापर्यंत थांबणार नाही. ते पाकव्याप्त कश्मीरमध्येही येतील. पुलवामा हल्ल्यानंतर हिंदुस्थानने बालाकोटमध्ये हल्ला केला होता. मात्र असे काही झाल्यास पाकिस्तान जशास तसे उत्तर देईल. ईट का जवाब पत्थर से देंगे. आम्ही युद्धास तयार आहोत.
– हिंदुस्थान आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झाल्यास संपूर्ण जग आणि संयुक्त राष्ट्र संघ जबाबदार असेल.
– कश्मीरच्या मुद्दय़ावर आंतरराष्ट्रीय समुदायाने मौन का धारण केले आहे?
– कश्मीरचा मुद्दा घेऊन पाकिस्तान जगाच्या प्रत्येक मंचावर जाणार आहे. आंतरराष्ट्रीय कोर्टातही जाऊ. लंडनमध्ये 370 कलम हटविण्याच्या विरोधात रॅली काढण्यात येईल.

पाकिस्तानची पोकळ धमकी, कश्मीरचा बदला जिहादने घेऊ!
कलम 370 हटविण्यात आल्यामुळे पाकिस्तानचे मानसिक संतुलन ढळले आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात पाकिस्तानचे राष्ट्रपती आरीफ अल्वी यांनी हिंदुस्थानने युद्ध छेडल्यास आम्ही हिंदुस्थानात जिहाद पुकारू, अशी धमकी दिली. पाकिस्तान शांतताप्रिय आहे, मात्र हिंदुस्थानने आगळिक केल्यास आमच्याकडे जिहादशिवाय दुसरा पर्याय नाही, असे गरळही त्यांनी ओकले.

पुलवामानंतर हिंदुस्थानने बालाकोटवर हल्ला केला होता. हिंदुस्थान आता पाकव्याप्त कश्मीरातही येईल. असे काही झाल्यास हम इट का जबाब पत्थर से देंगे.- पंतप्रधान इम्रान खान

आपली प्रतिक्रिया द्या