
सर्वत्र नववर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू असताना भांडुपमधील चार कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला. बेस्ट बसच्या अपघातात एका क्षणात होत्याचे नव्हते झाले आणि तीन संसार उद्ध्वस्त झाले. सोमवारी रात्री झालेल्या 606 क्रमांकाच्या बेस्ट बसच्या अपघातात चार जणांचा नाहक बळी गेल्याने भांडुप पश्चिमेकडील परिसरासह मृतक राहत होते त्या ठिकाणी शोककळा पसरली आहे.
सोमवारी रात्री 606 क्रमांकाच्या बेस्ट बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पादचाऱ्यांना चिरडत पुढे गेली. पुढे जाऊन बस थांबली, पण बसखाली अनेकजण अडकून पडले होते. अचानक झालेल्या या घटनेमुळे सर्वांचा थरकाप उडाला. काही क्षण नेमके काय झाले तेच कोणाला समजले नाही. बेस्ट बसने अनेकांना चिरडल्याचे कळताच हाहाकार उडाला. तीन महिलांसह एक पुरुष अत्यंत गंभीर अवस्थेत निपचित पडलेले होते. तर नऊ ते दहा जण वेदनेने विव्हळत होते. ते सर्व चित्र भयावह होते, असे प्रत्यक्षदर्शीकडून सांगण्यात येते. मृतांच्या पाल्यांवरील आईवडिलांचे छत्र हरपल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दुःखाचा डोंगर कोसळला
या अपघातात टेंभीपाडा येथील प्रदीप चाळीत राहणारी वर्षा सावंत (25), शिवाजीनगरात राहणाऱया मानसी गुरव (49), साईनगर पंपाऊंडमध्ये राहणाऱया प्रतिमा रासम (35) आणि शिवाजीनगरात राहणारे प्रशांत शिंदे (42) यांचा या अपघातात मृत्यू झाल्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वर्षा वगळता बाकीचे सर्व विवाहित होते. त्यामुळे तीन संसार उद्ध्वस्त झाले.




























































