रत्नागिरीत वाळूमाफियांचा महिला उपजिल्हाधिकाऱयावर हल्ला

तहसील आणि खनिकर्म विभाग सुस्तावलेला असल्याने रत्नागिरीत वाळूमाफियांची दादागिरी सुरू झाली आहे. आज वाळू माफियांनी चक्क उपजिल्हाधिकाऱयांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. या हल्ल्यानंतर तहसीलदार कार्यालयाला जाग आली असून ते आता कारवाईसाठी सरसावले आहे.

उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम मार्ंनग वॉकसाठी पांढरा समुद्र येथे गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी समुद्रकिनाऱयाचे मोबाईलवर चित्रीकरण सुरू केले. त्याचवेळी वाळूमाफिया वाळू चोरी करत होते. आपल्या वाळू चोरीचे चित्रिकरण केल्याचा त्यांना संशय आला. नेहमीप्रमाणे त्यांनी दादागिरी करायला सुरुवात केली.

वाळू चोरीचे चित्रीकरण केल्याच्या संशयावरून उपजिल्हाधिकारी हर्षलता धनराज गेडाम यांच्यावर वाळू माफियांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी फावडा घेत उपजिल्हाधिकारी गेडाम यांच्यावर चाल केली. मात्र उपजिल्हाधिकारी गेडाम या कराटे नॅशनल चॅम्पियन असल्याने त्यांनी हल्लेखोरांनाच पाणी पाजले. शुक्रवारी सकाळी पांढरा समुद्र येथे ही घटना घडली. वाळू माफियांनी थेट उपजिल्हाधिकाऱयांवर हल्ला केल्यामुळे वाळू चोरीचे प्रकरण ऐरणीवर आले आहे. श्रीमती गेडाम यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर वाळू चोरांवर कारवाई करण्याचे आदेश तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी मंडल अधिकाऱयांना दिले आहेत.