राज्यात महायुती सरकारच्या काळात महिला, दलित अल्पसंख्याकासह समाजातील प्रत्येक घटकावरील अत्याचार वाढले आहेत. दादागिरी आणि खोक्यांच्या बळावर सत्तेत बसून हे संविधान बदलायला निघाले आहेत, पण येत्या 26 नोव्हेंबरला विधानसभेची मुदत संपत आहे आणि त्याच दिवशी संविधान दिन आहे. त्यामुळे या निवडणुकीत संविधानविरोधी शक्तीला सत्तेतून पायउतार करणारच असा निर्धार आज शिवसेनेच्या वज्रनिर्धार मेळाव्यात सामाजिक कार्यकर्ते व विचारवंतांनी केला.
शिवसेनेच्या वतीने समाजाच्या विविध क्षेत्रांतील समाजघटकांसाठी कार्यरत असलेल्या संविधानप्रेमी, लोकशाहीवादी विचारांच्या सर्व स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटनेचे मान्यवर, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विचारवंत, साहित्यिक यांची राज्यव्यापी वज्रनिर्धार परिषद शिवाजी मंदिरमध्ये आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातून या परिषदेसाठी आलेल्या सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि विचारवंतांनी समाजातील दलित, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, अल्पसंख्याकांच्या प्रश्नापासून कॉर्पोरेट क्षेत्रातील समस्या मांडल्या आणि महायुती सरकारला धारेवर धरले. या परिषदेला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना नेते, खासदार अरविंद सावंत, उपनेते विनोद घोसाळकर, रवींद्र मिर्लेकर, परिषदेचे निमंत्रक, शिवसेना सचिव डॉ. संजय लाखे पाटील, साईनाथ दुर्गे, पराग डाके, विभागप्रमुख महेश सावंत तसेच नितीन वैद्य, शाकीर शेख, डॉल्बी डिसुझा, दत्ता तुंबवाड, अविनाश कानडे, मानव कांबळे, श्रीनिवास शिंदे, सीताराम शेलार, चयनिका शहा, सबा खान उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय गोपाळ यांनी केले. शाहीर संभाजी भगत यांनी ‘सोडवा संविधान, जनाचं विधान’ हा पोवाडा सादर करत स्फूर्ती जागवली.
महिलांवरील अत्याचारांचा पाढा
सामाजिक कार्यकर्ते कबीर वासंती शेलार यांनी महिला आणि मुलींवर अत्याचाराचा पाढा वाचला. बदलापूर शाळेतील अत्याचारप्रकरणी भाजपने मुख्य सूत्रधारांना पाठीशी घातले. स्त्रिया आणि मुलींवरील अत्याचार सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी सरकारला दिला.तर रत्नप्रभा साबळे यांनी कॉर्पोरेट क्षेत्रातील समस्या मांडल्या.
मुरबे आणि वाढवण बंदराला विरोध
भारत जोडो अभियानचे पालघरमधील कार्यकर्ते छबिलदास गायकवाड यांनी वाढवण बंदर तसेच मुरबे बंदराला मच्छीमार आणि आदिवासींचा विरोध असल्याचे सांगितले. भांडुपमधील रौफ खान यांनी महाविकास आघाडीने मुस्लिम समाजाला सोबत घेऊन जाण्याची अपेक्षा व्यक्त केली. विशाल जाधव यांनी अन्न सुरक्षा कायदा करण्याची मागणी केली. ललित बाबर यांनी मुंबईतील बुट पॉलीश करणाऱयांचे प्रश्न मांडले. वर्धा जिह्यातील हरीश ठाकरे, भांडुपमधील रौफ खान यांनीही महत्वाचे मुद्दे मांडले. तर डॉ. अभय शुक्ला यांनी जनतेचा आग्रहनामा सादर केला.
दोन ठगांमुळे महाराष्ट्रात गुजरातींबद्दल द्वेष पसरलाय
जे प्रक्षोभक भाषण करून द्वेष पसरवण्याचे काम करतात आणि महिलांना असुरक्षित वाटेल असे वातावरण ज्यांनी निर्माण केले आहे त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, असे महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी म्हणाले. देशातील अल्पसंख्याकांनासुद्धा विश्वास द्यायला हवा. तेसुद्धा देशाचे नागरिक आहेत याचे भान ठेवले पाहिजे, असेही तुषार गांधी म्हणाले. मोदी-शहांचा उल्लेख त्यांनी ठग असा केला. दोन गुजराती ठग पाप करतात, त्यांच्यामुळे महाराष्ट्रात संपूर्ण गुजराती समाजाबद्दल द्वेष निर्माण झालाय. गुजरातींचे महाराष्ट्राबद्दलचे जे प्रेम आहे त्याची जाणीव सर्वांनी ठेवावी, अशी विनंती गांधी यांनी केली.
दिल्लीचेही तख्त हलवितो महाराष्ट्र माझा
लोकसभा निवडणुकीत वज्राहून कठोर निर्धार घेऊन या सर्व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात मोहोळ उठवले. येत्या विधानसभा निवडणुकीतसुद्धा ते जोमाने कामाला लागणार आहेत. तोच निर्धार व्यक्त करण्यासाठी सर्व कार्यकर्ते येथे जमले आहेत. ‘जय जय महाराष्ट्र माझा’ या गाण्यात ‘दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा’ अशी ओळ आहे. पण लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनता आणि मतदारांनी ‘दिल्लीचे तख्त हलवितो महाराष्ट्र माझा’ हे जगाला दाखवून दिलेय, असा हल्ला यावेळी उल्का महाजन यांनी भाजप सरकारवर केला.
श्रीकांत शिंदे गद्दारांचे खासदार
दत्ता उमरे यांनी कल्याणमध्ये दादागिरीच्या जोरावर सुरू असलेल्या बेकायदा कामांचा त्यांनी पाढा वाचला. त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे असा उल्लेख करताच गद्दार गद्दार असा आवाज गर्दीतून झाला तेव्हा गद्दारांचे खासदार असे उमरे म्हणाले.
खोके सरकारला उत्तर देणार
सामाजिक कार्यकर्त्यांनी यावेळी मांडलेले प्रश्न आणि महाविकास आघाडीकडून असलेल्या अपेक्षांची पूर्तता करण्याच्या दृष्टीने विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी उत्तरे दिली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जसे रयतेचे राज्य होते तसेच राज्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अपेक्षित आहे. शिवसेनेने जातीभेद कधीच मानला नाही. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर ‘मार्टी’ला 100 टक्के निधी देण्याचे आश्वासन दिले. दुर्गम भागातील शाळा बंद होत असल्याच्या तक्रारीला उत्तर देताना ते म्हणाले की, अतिदुर्गम भागातील प्रत्येकाला शिक्षण मिळाले पाहिजे ही आमची भूमिका आहे. कल्याणमधील श्रीकांत शिंदे यांच्या दादागिरीच्या प्रश्नावर बोलताना, कल्याणमध्ये दादागिरी आणि खोके यावर अनधिकृत कामे सुरू आहेत. पण जनता त्यांना निवडणुकीत उत्तर देईल, असा इशारा दानवे यांनी दिला.