
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
देशात राहण्यालायक शहरांमध्ये पुण्याने प्रथम स्थान पटकावले आहे. ‘लिवेबिलिटी इंडेक्स’ च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. या यादीत नवी मुंबई दुसऱ्या तर महानगरी मुंबई तिसऱ्या स्थानावर आहे. या यादीत चेन्नई ४० व्या तर नवी दिल्ली ६५ व्या क्रमांकावर आहे. या स्पर्धेत कोलकाता सहभागी झाले नव्हते. केंद्रीय शहरविकासमंत्री हरदीपसिंह पुरी यांनी सोमवारी ही यादी जाहीर केली आहे. शहरातील राहणीमान, स्वस्त व सुलभ सेवा याबाबत सरकारकडून करण्यात आलेले हे पहिले सर्वेक्षण आहे.
शहरातील सामान्य नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याचे पुरी यांना सांगितले. शहरातील जनतेला मूलभूत सुविधा देण्यासाठी प्राधान्य असल्याचेही ते म्हणाले. त्यासाठी शहरांना आर्थिक मदत करण्याबरोबर तेथील औद्योगिक वाढीला प्रोत्साहन देण्यात येत आहे. शहरातील राहणीमानाबाबत देशभरात केलेले हे पहिलेच सर्वेक्षण आहे. शहराच्या विकासाला चालना दिल्याने निकोप स्पर्धा वाढीस लागेल आणि शहरातील जीवनमान उंचावेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
संस्थात्मक आणि सामाजिक विकास, आर्थिक आणि भौतिक सुविधा यावर आधारित हे सर्वेक्षण करण्यात आले असून यासाठी १५ विभाग करण्यात आले होते. तर ७८ निकष ठेवून त्यासाठी १०० गुण होते. संस्थात्मक आणि सामाजिक विकासासाठी २५ गुण ठेवण्यात आले होते. तर भौतिक सुविधांसाठी सर्वाधिक ४५ गुण देण्यात आले होते. तर पाच गुण आर्थिक सुविधांसाठी देण्यात आले होते.





















































