
सामना प्रतिनिधी । मुंबई
तुमच्या आयकर परताव्याची (रिफंड) रक्कम मंजूर झाली आहे. ती तुमच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी तुमचा बँक खाते क्रमांक आम्हाला पाठवा. खाते क्रमांक चुकीचा असला तर खाली दिलेल्या लिंकला व्हिजिट करा असा एसएमएस तुमच्या मोबाईलवर आला तर सावध राहा. कारण आयकर खात्याचे बोगस पेज बनवून संगणकीय प्रणालीने आयकर खातेधारकांचा परतावा लुटणारी टोळी पूर्ण देशभर सक्रिय झाल्याचा इशारा महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने नागरिकांना दिला आहे.
आयकर खात्याचे बोगस पेज बनविणारी आंतरराज्य गुन्हेगार टोळी आयकरधारकांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस टाकून लुटत असल्याचा इशारा पोलिसांच्या सायबर सेलने दिला. आयटी रिटर्न भरण्याची पहिली डेडलाइन संपल्यावर ही टोळी सक्रिय झाली आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक आणि महाराष्ट्र सायबर क्राइम विभागाचे प्रमुख बलसिंग राजपूत यांनी दिली आहे.
करदात्यांनी आपला बँक खाते क्रमांक शेअर करू नये
आपल्या मोबाईलवर येणाऱया आयकर परतावा मेसेजवरील सूचनेनुसार आयकरधारकांनी आपला बँक खाते तपशील देऊ नये. कारण तुमच्या बँक खात्यातून रकमेची लूट करणारी आंतरराज्य टोळी सध्या देशभरात सक्रिय झाली आहे. शिवाय अशा टोळय़ांसाठी तुमच्या बँक खात्याचा तपशील मिळवून तो सायबर लुटारूंना विकण्याचे उद्योगही अनेकांनी सुरू केले आहेत, असेही राजपूत यांनी स्पष्ट केले आहे.
सायबर लुटारूंची मोडस् ऑपरेंडी
– महिनाभरापूर्वीपासून आयकरधारकांना मोबाईलवर आयटी रिटर्नबाबतचे बोगस मेसेज येऊ लागले आहेत.
– या मेसेजेसमध्ये तुमचा आयकर परतावा मंजूर झालाय. तो हस्तांतरित करण्यासाठी आम्हाला तुमचा अचूक बँक खाते क्रमांक हवा आहे असे म्हटलेले असते.
– आयकरधारकाने आपला बँक खाते तपशील द्यावा म्हणून या टेक्स्ट मेसेजमध्ये पुढे असे नमूद केलेले असते की, तुम्ही दिलेला बँक खाते क्रमांक चुकीचा असल्यास आम्हाला तुमचा परतावा तुम्हाला वेळेत देता येणार नाही. तुम्ही आम्ही दिलेल्या मेसेजवर क्लिक करा आणि लॉग इन करून तुमचा बँक खात्याचा तपशील द्या. या लिंकला भेट दिल्यावर आयकर विभागाचे होम पेजचा आपल्याला दिसते, पण ते अधिकृत नाही. या पेजवरील लॉग इनमध्ये आपण बँक खाते तपशील दिल्यास लुटारू टोळी आपला बँक खाते क्रमांक हॅक करीत त्यातून जमा आयकर परतावा परस्पर आपल्या खात्यात हस्तांतरित करू शकते असे महाराष्ट्र सायबर सेल प्रमुख बलसिंग राजपूत यांनी सांगितले.




























































