रोह्यात स्पेशल 26 चित्रपटाप्रमाणे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन तोतया इन्कमटॅक्स अधिकाऱ्यांच्या रोहा पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. फैयाज काझी, गौस शेख आणि कुदबुद्दिन सय्यद असे अटक केलेल्या भामट्यांची नावे आहेत. यांचा साथीदार आयाज शेख हा फरार असून त्याचा शोध सुरू आहे. या चौघांनी आयकर विभागाचे अधिकारी असल्याचे सांगून व्यावसायिकाला लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यावसायिकाला संशय आल्याने त्याने त्यांचा डाव उधळून लावला.
रोह्यातील खालचा मोहल्ला परिसरात राहणारे व्यावसायिक आसिफ अन्सारी यांच्या घरात मंगळवारी सायंकाळी चारअनोळखी व्यक्ती घुसले. या चौघांनी अन्सारी यांना बनावट आयडी कार्ड दाखवून आयकर अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच तुमच्या विरोधात सर्च वॉरंट असल्याचे सांगत घराची झडती घेण्यास सुरुवात केली. या चौघांवर अन्सारी यांना संशय येताच त्या चौघांनी त्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. सुरू असलेला आरडाओरडा ऐकून अन्सारी यांच्या वहिनी बाहेर आल्या असता या भामट्यांनी त्यांच्या गळ्यातील चेनदेखील हिसकावण्याचा प्रयत्न केला. अखेर हे तोतया अधिकारी असल्याचे लक्षात येताच अन्सारी यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने या तीन भामट्यांना पकडून रं रोहा पोलिसांच्या ताब्यात दिले तर त्यांचा साथीदार आयाज शेख हा पळून जाण्यात यशस्वी झाला.