
देशात इंधन दरवाढीचा भडका सातत्याने उडत असून गेल्या सहा दिवसांत पाचवेळा पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. रविवारी पेट्रोलच्या प्रतिलिटर दरात 50 पैशांची तर डिझेलच्या दरात 55 पैशांची वाढ झाली आहे. रविवारी झालेल्या दरवाढीमुळे मुंबईतील प्रतिलिटर पेट्रोलचा दर 113 रुपये 85 पैसे तर डिझेलचा दर 98 रुपये 10 पैसे एवढा झाला आहे. त्याचा थेट फटका सर्वसामान्यांना बसत असून महागाईमुळे त्यांचे आर्थिक गणित कोलमडताना दिसत आहे. दरम्यान, कच्च्या तेलाच्या प्रतिबॅलरच्या किमतीत 30 डॉलरची वाढ होऊनही देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबर 2021 पासून इंधन दरवाढ करण्यात आली नव्हती. मात्र आता निडणूक निकालानंतर इंधन दरवाढीचा भडका सुरूच आहे.



























































