धावांचा पाठलाग करण्याचे तंत्र कर्णधार विराटकडून शिकलो, धडाकेबाज अय्यरची कबुली

4768

हिंदुस्थानी संघाने न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या दोन्ही टी-20 सामन्यात विजय मिळवत मालिकेत 2-0 अशी आघाडी घेत आपली विजयी दौड कायम राखली आहे. या दोन्ही सामन्यात चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या श्रेयस अय्यरने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. धावांचा यशस्वी पाठलाग कसा करायचा हे मी कर्णधार विराट कोहलीकडूनच शिकलो असे मुंबईकर श्रेयस म्हणाला.

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात श्रेयसने 33 चेंडूत 44 धावा फटकावल्या. टीम इंडियाच्या विजयात श्रेयसची खेळी महत्त्वाची होती. या विजयानंतर श्रेयसने आपण विराट कोहलीच्या पावलावर चालत असल्याचे सांगितले. श्रेयसने दुसऱ्या टी-20 मध्ये के.एल. राहुल सोबत तिसऱ्या विकेटसाठी 86 धावांची भागिदारी केली. रोहित शर्मा आणि विराट कोहली बाद झाल्यानंतर हिंदुस्थानी संघाला विजयाच्या जवळ पोहोचवण्यात राहुल- श्रेयस जोडीने महत्त्वाची भूमिका पार पाडली. या दोघांमुळे टीम इंडियाने विजयासाठीचे 133 धावांचे लक्ष्य 15 चेंडू राखून सहज पार केले.

श्रेयसच ठरला दोन विजयांचा फिनिशर
पहिल्या सामन्यात श्रेयसने शानदार खेळी करत विजय मिळवून दिला होता. त्याच्या 29 चेंडूतील नाबाद 58 धावांच्या जोरावर हिंदुस्थानने 204 धावांचे आव्हान 6 चेंडू राखून पार केले. दोन्ही सामन्यातील श्रेयसच्या या खेळीमुळे हिंदुस्थानी संघाला 5 लढतीच्या टी-20 मालिकेत 2-0 अशी आघाडी तर घेता आलीच, शिवाय संघातील चौथ्या क्रमांकाचा प्रश्न मिटल्याचे स्पष्ट संकेत त्याच्या खेळीने मिळाले.

आपली प्रतिक्रिया द्या