#INDvSA रागाच्या भरात लगावला ठोसा, सलामीचा फलंदाज तिसऱ्या कसोटीतून बाहेर

2044

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये तीन कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. पहिले दोन्ही सामने जिंकत टीम इंडियाने 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. तिसरा सामना शनिवारपासून सुरू होणार आहे. या सामन्यापूर्वी पाहुण्या आफ्रिकेला तगडा धक्का बसला आहे. आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज अॅडन मार्क्रम दुखापतीमुळे तिसऱ्या सामन्याला मुकणार आहे. अद्याप मार्क्रमच्या जागी दुसऱ्या खेळाडूची निवड करण्यात आलेली नाही. परंतु मार्क्रमला ही दुखापत का झाली हा मजेशीर किस्सा असून आफ्रिकेच्या संघ व्यवस्थापकने याचा खुलासा केला आहे.

‘पुण्यामध्ये झालेल्या दुसऱ्या लढतीदरम्यान मार्क्रम दुखापतग्रस्त झाला. या लढतीत आफ्रिकेला एक डाव आणि 137 धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. या लढतीत मार्क्रम दोन्ही डावात शून्यावर बाद झाला होता. याआधी पहिल्या लढतीत देखील तो 5 आणि 39 धावा करू शकला होता. खराब प्रदर्शनामुळे मार्क्रमने रागाच्या भरामध्ये एका टणक वस्तूवर जोरात ठोसा मारला आणि दुखापतग्रस्त झाला’, असे एक पत्रक काढून आफ्रिकेने स्पष्ट केले आहे.

दरम्यान, आफ्रिकन संघाचे वैद्यकीय सल्लागार हशेंद्र रामजी यांनी सांगितले की, सीटी स्कॅनमध्ये मार्क्रमच्या मनगटाचे हाड फ्रॅक्चर झाल्याचे निदर्शनास आले आहे. यावर वैद्यकीय उपचार घेण्यासाठी त्याला तातडीने आफ्रिकेला परतावे लागणार आहे. त्यामुळे टीम इंडियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी त्याला अनफिट घोषित करण्यात आले आहे. मार्क्रमने देखील ही संपूर्णत: आपली चूक असल्याचे म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या