क्रिकेटमध्ये हे असं कधीच नाही पाहिलं, वादग्रस्त निर्णयावर विराटची प्रतिक्रिया

1540

रविवारी झालेल्या पहिल्या एकदिवसीय लढतीत टीम इंडियाला वेस्ट इंडीजकडून 8 विकेट्सने पराभव स्वीकारावा लागला. या लढतीमध्ये टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जाडेजा याला धावबाद देण्यात आलेल्या निर्णयावर वाद सुरू झाला आहे. कर्णधार विराट कोहली याने देखील यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

विंडीजविरुद्ध चेन्नईत झालेल्या पहिल्या लढतीत टीम इंडियाच्या डावातील 48 व्या षटकादरम्यान हा प्रकार घडला. सिंगल काढण्यासाठी पळालेला जाडेजा क्रिजमध्ये पोहोचण्यापूर्वी विंडीजचा क्षेत्ररक्षक रोस्टन चेज याने डायरेक्ट थ्रो करत स्टंप उडवला. रविंद्र जाडेजा धावबाद झाला होता, मात्र मैदानावरील पंचांनी विंडीजची अपील फेटाळून लावली. याचा व्हिडीओ मैदानावरील मोठ्या स्क्रिनवर दाखवण्यात आल्यानंतर विंडीजचा कर्णधार केरॉन पोलार्डने पुन्हा मैदानावरील पंचांकडे दाद मागितली. यानंतर दक्षिण आफ्रिकन पंच शॉन जॉर्ज यांना तिसऱ्या पंचाकडे इशारा केला. तिसऱ्या पंचांना जाडेजाला बाद ठरवले.

सामना संपल्यानंतर विराटने यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, ‘क्षेत्ररक्षकाने विचारल्यानंतर पंचांनी नाबाद ठरवले. हा प्रकार इथेच संपायला हवा होता. मैदानाबाहेर बसलेल्या लोकांनी टीव्हीवर पाहून खेळाडूंना पुन्हा एकदा पंचांकडे दाद मागण्यास सांगितले, हे चूक आहे. मी क्रिकेटमध्ये असे कधीही पाहिले नव्हते. माझ्या मते मॅच रेफरी आणि पंचांनी या प्रकरणाची छाननी करायला हवी आणि पुन्हा असे होणार नाही यासाठी उपाय करायला हवेत.’

jadeja

विराटसह टीम इंडियाचे माजी खेळाडू आकाश चोप्रा यांनी ट्वीट करून यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘मैदानावरील पंचांनी जाडेजाला नाबाद ठरवले होते. ड्रेसिंग रुममधून कोणी तरी पोलार्डला इशारा केला की जाडेजा बाद आहे. यानंतर त्याने पुन्हा अपील केली आणि हे प्रकरण तिसऱ्या पंचांपर्यंत गेले. जाडेजाला बाद ठरवणे न्यायपूर्ण आहे का?’, असा सवाल चोप्राने उपस्थित केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या