IND VS AUS – दुसऱ्या दिवसाच्या खेळावर पाणी फेरले, पावसामुळे सामना थांबवला

ऑस्ट्रेलिया आणि हिंदुस्थान संघात ब्रिस्बेन येथे सुरू असलेल्या निर्णायक कसोटीत यजमान संघाने पहिल्या डावात 369 धावांपर्यंत मजल मारली. अखेरच्या तीन खेळाडूंनी वेगाने 50 धावा जोडल्याने ऑस्ट्रेलियाला 350 धावांचा टप्पा ओलांडता आला. नाथन लायनने 24, स्टार्कने नाबाद 20 धावांचे योगदान दिले. त्यानंतर ब्रिस्बेनमध्ये पाऊस पडायला सुरुवात झाल्याने सामना थांबविण्यात आला. पावसामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ अर्धा तास लवकर सुरू करण्यात येणार आहे. दुसऱ्या दिवासाखेर टीम इंडियाने दोन विकेट गमावत 62 धावा केल्या आहेत.

तत्पूर्वी टीम पेन आणि कॅमरन ग्रीन यांनी कालच्या 5 बाद 274 वरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली. दोघांनी संघाला 300 चा टप्पा ओलांडून दिला. या दरम्यान पेनने अर्धशतक झळकावले. अर्धशतकानंतर तो शार्दूल ठाकूरच्या गोलंदाजीवर बाद झाला. पाठोपाठ सुंदरने ग्रीनला, तर शार्दूलने कमिन्सला बाद करत ऑस्ट्रेलियाची अवस्था 8 बाद 315 केली. मात्र शेपटाने तडाखा दिल्याने टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाचा डाव झटपट गुंडाळता आला नाही.

टीम इंडियाकडून शार्दूल ठाकूर, टी. नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 3 बळी घेतले, तर मोहम्मद सिराजने 1 बळी घेतला.

आपली प्रतिक्रिया द्या