Video : कमिन्सच्या ‘सुपरमॅन थ्रो’वर पुजारा असा झाला रनआऊट

16

सामना ऑनलाईन । अडलेड

अडलेडमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळणारा डाव चेतेश्वर पुजाराने सावरला. पुजाराने अश्विनसोबत पन्नास धावांची भागीदारी करत टीम इंडियाला 200 पार पोहोचवले. या दरम्यान पुजाराने कारकीर्दीतील 16 वे शतक झळकावले. शतकानंतर पुजाराने शमीसोबत मिळून टीम इंडियाला 250 चा टप्पा गाठून दिला. आक्रमक खेळी करणाऱ्या पुजाराला बाद करण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी कंबर कसली. परंतु 88 व्या षटकापर्यंत त्यांना यश मिळाले नाही. दिवसभरातील शेवटचे दोन षटकं बाकी असताना कमिन्सच्या ‘सुपमॅन थ्रो’मुळे पुजाराची झुंजार खेळी संपुष्टात आली.

टीम इंडियाच्या डावाच्या 88 व्या षटकातील पाचव्या चेंडूवर पुजाराने हलकेच चेंडू ऑफसाईडला टोलावला आणि धाव घेण्यासाठी वेगाने पळाला. परंतु कमिन्सने वेगाने चेंडूवर झडप घालत हवेत सूर मारत पुजाराला धावबाद केले. बाद होण्यापूर्वी पुजाराने 246 चेंडूत 123 धावांची शतकी खेळी केली. ऑस्ट्रेलियातील पुजाराचे हे पहिलेच शतक असून या खेळीमुळे टीम इंडियाला सन्मानजनक धावसंख्या गाठता आली. पुजारा बाद झाल्यानंतर पहिल्या दिवसाचा खेळ थांबवण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या