Ind vs Aus कसोटी शतकाचा दुष्काळ संपणार?

तब्बल तीन वर्षे अपयशाच्या गर्तेत सापडलेला विराट कोहली अखेर गतवर्षी डिसेंबरमध्ये पुन्हा फॉर्मात परतला. त्याने टी-20 क्रिकेटमध्ये कारकीर्दीतील पहिले शतक ठोकले, तर एकदिवसीय शतक ठोकून आपण अजून संपलेलो नाही, हे क्रिकेटविश्वाला दाखवून दिले. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये त्याची बॅट पूर्वीसारखी तळपणार की नाही याकडे त्याच्या तमाम चाहत्यांचे लक्ष असेल. विराटने नोव्हेंबर 2019 मध्ये बांगलादेशविरुद्ध अखेरचे कसोटी शतक झळकाविले होते. म्हणजेच त्याच्या कसोटी शतकाला तीन वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. त्यामुळे हिंदुस्थान-ऑस्ट्रेलियादरम्यानच्या मालिकेत तरी विराटचा कसोटी शतकाचा दुष्काळ संपणार का? याकडे अवघ्या क्रिकेटविश्वाच्या नजरा असतील.

मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध अपयशी

ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात विराट कोहलीची बॅट नेहमीच रुसलेली असते असा इतिहास आहे. 2017 च्या मागील कसोटी मालिकेत विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांत केवळ 46 धावा केल्या होत्या. दुखापतीमुळे त्यावेळी तो एका कसोटीस मुकला होता. त्याआधी 2013 मध्ये ऑस्ट्रेलियन संघ हिंदुस्थान दौऱ्यावर आला होता तेव्हाही विराट कोहली अपयशीच ठरला होता. चार सामन्यांच्या मालिकेत त्याने एका शतकासह 217 धावा केल्या होत्या. म्हणजेच विराटने मायदेशात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 कसोटींत केवळ एक शतक झळकावलेले आहे, मात्र ऑस्ट्रेलियात याच विराटने 6 कसोटी शतके ठोकली आहेत हे आपल्याला विसरता येणार नाही. विराटची ऑस्ट्रेलियाविरुद्धची एकूण कामगिरी तशी चांगली आहे. त्याने या देशाविरुद्ध 20 कसोटींत 48.05च्या सरासरीने एकूण 1,682 फटकावल्या असून यात 7 शतकांचा समावेश आहे.

मागील 20 कसोटींत एकही शतक नाही

विराट कोहलीला अखेरचे कसोटी शतक ठोकल्यानंतर दरम्यानच्या काळात 20 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 6 अर्धशतके झळकावली, पण शतकाला त्याला गवसणी घालता आलेली नाही. शिवाय त्याने या 20 सामन्यांत केवळ 26.20 च्या सरासरीने 917 धावा केल्याने या हिंदुस्थानच्या ‘रनमशीन’ला झाले तरी काय? हाच प्रश्न विराटच्या चाहत्यांना पडलाय. बांगलादेशविरुद्धच्या मागील कसोटी मालिकेतही विराटने 2 सामन्यांत केवळ 45 धावांच केल्या होत्या.