
सामना ऑनलाईन, बंगळुरू
परदेशातील मैदान मारून आलेल्या विराट कोहलीच्या ‘टीम इंडिया’ला मायदेशात पाहुण्या ऑस्ट्रेलियाकडून सलामीच्या टी-20 क्रिकेट सामन्यात पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. दोन सामन्यांची ही मालिका किमान बरोबरीत सोडविण्यासाठी हिंदुस्थानला बुधवारी बंगळुरूमध्ये होणाऱ्या दुसऱ्या व अखेरच्या लढतीत आता जिंकावेच लागेल.
विशाखापट्टणच्या पहिल्या लढतीत खराब फलंदाजीमुळे हिंदुस्थानला पराभव पत्करावा लागला. गोलंदाजांनी या लढतीत जिवाचे रान करीत अखेरच्या चेंडूंपर्यंत सामना नेला होता, मात्र उमेश यादवने अखेरच्या षटकात 14 धावा दिल्याने हिंदुस्थानने हा सामना घालवला. ‘टीम इंडिया’ला विश्वचषक स्पर्धेची तयारी करण्यासाठी ही अखेरची संधी असल्याने कर्णधार विराट कोहली, लोकेश राहुल व रिषभ पंत या नव्या दमाच्या खेळाडूंना अधिकाधिक संधी देऊ शकतो. मात्र, उद्याची लढत ‘जिंका किंवा मरा’ अशी असल्याने सलामीवीर शिखर धवनला संधी मिळते काय ते बघावे लागेल. जसप्रीत बुमराहने झोकात पुनरागमन केले आहे, मात्र उमेश यादवला अखेरच्या षटकात 14 धावांचा बचाव करता आला नाही. त्यामुळे त्याच्याऐवजी सिद्धार्थ कौलला दुसऱ्या टी-20 सामन्यात संधी मिळू शकते.


























































