पावसाच्या विश्रांती नंतर अखेर चौथ्या दिवशी टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यामध्ये दुसऱ्या कसोटी सामन्याला कानपुरमध्ये सुरुवात झाली. विराट कोहलीने पहिल्या डावात दमदार फलंदाजी करत ऐतिहासिक कामगिरी केली आणि सचिन तेंडूलकरचा विक्रम मोडला.
बांगलादेशने पहिल्या डावात फलंदाजी करताना 233 धावा केल्या. बांगलादेशकडून मोमीनुलने सर्वाधिक 107 धावा केल्या आहेत. प्रत्युत्तरात टीम इंडियाच्या फलंदाजांनी आक्रमक पवित्रा धारण करत बांगालदेशच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. मात्र या सामन्यात विराट कोहलीने दमदार फलंदाजी केली आणि 35 धावा करताच सचिन तेंडूलकरचा आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक 27 हजार धावा करण्याचा विक्रम मोडला. विराट कोहलीने 535 आंतरराष्ट्रीय सामने आणि 594 डावांमध्ये हा ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे. सचिन तेंडूलकरने 623 डावांमध्ये 27 हजार धावा केल्या होत्या.
विराटने या सामन्यात 35 चेंडूंमध्ये 47 धावा केल्या, अवघ्या तीन धावांनी त्याचे अर्धशतक हुकले. सध्या सामना सुरू असून टीम इंडियाने विक्रमी 34.4 षटकात 285 धावा केल्या आणि 52 धावांची आघाडी घेत आपला पहिला डाव घोषित केला आहे.