IND Vs ENG 3rd Test – सामना जिंकूनही इंग्लंडला ICC ने ठोठावला दंड, WTC गुणतालिकेतही बसला फटका

लॉर्ड्स कसोटीमध्ये इंग्लंडने टीम इंडियाचा 22 धावांनी पराभव केला. इंग्लंडने या विजयासह पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत आता 2-1 अशी आघाडी घेतली आहे. परंतु सामना जिंकूनही ICC ने इंग्लंडला दंड ठोठावला आहे. स्लो ओव्हर रेटमुळे इंग्लंडला सामना शुल्काच्या 10 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. तसेच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) गुणतालिकेतूनही दोन गुण वजा करण्यात आले आहेत. त्यामुळे गुणतालिकेत इंग्लंडचा संघ तिसऱ्या स्थानावर घसरला आहे.

आयसीसीने जारी केलेल्या निवेदनानुसार, इंग्लंडचा संघ सामन्यात दोन षटके पिछाडीवर होता. त्यामुळे सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी कारवाई करत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आणि संघावर सामना शुल्काच्या 10 टक्के दंड लावला आहे. ICC च्या नियमानुसार कलम 2.22 नुसार कारवाई करण्यात आली आहे. तसेच WTC नियम 16.11.2 नुसार, प्रत्येक स्लो ओव्हरसाठी एक गुण वजा केला जातो. त्यानुसार इंग्लंडच्या गुणतालिकेतून दोन गुण वजा केले आहेत. इंग्लंडचे गुण आता 24 वरून 22 झाले आहेत. याचा फायदा श्रीलंकेला झाला असून श्रीलंकेने 66.67 टक्के गुणांसह दुसऱ्या स्थानावर कब्जा केला आहे. तर पहिल्या क्रमांकावर 100 गुणांसह ऑस्ट्रेलिया विराजमान आहे.