चौथ्या कसोटीवर इंग्लंडची पकड; पहिल्या डावात 311 धावांची आघाडी, हिंदुस्थानविरुद्ध स्टोक्सचे झुंजार शतक

यजमान इंग्लंडने अॅण्डरसन-तेंडुलकर ट्रॉफीतील चौथ्या कसोटी क्रिकेट सामन्यावर चौथ्या दिवशी मजबूत पकड मिळविली. जो रूटच्या दीड शतकी खेळीनंतर कर्णधार बेन स्टोक्सने आज 141 धावांची झुंजार खेळी करीत इंग्लंडला 157.1 षटकांत 669 धावांचा डोंगर उभारून देत पहिल्या डावात 311 धावांची मोठी आघाडी घेतली. प्रत्युत्तरादाखल उपाहारापर्यंत हिंदुस्थानची 3 षटकांत 2 बाद 1 धाव अशी दाणादाण उडाली होती.

हिंदुस्थानला पहिल्या डावात 358 धावांवर रोखल्यानंतर इंग्लंडने फलंदाजीत वर्चस्व गाजविले. यजमान संघाने तिसऱया दिवसाच्या 7 बाद 544 धावसंख्येवरून शनिवारी सकाळी पुढे खेळायला सुरुवात केली. जसप्रीत बुमराने लियाम डॉसनचा (26) त्रिफळा उडवून हिंदुस्थानला आठवे यश मिळवून दिलेस, मात्र त्याच्या जागेवर आलेल्या ब्रायडन कार्सेने स्टोक्सला सुरेख साथ दिली. या दोघांनी नवव्या विकेटसाठी 97 चेंडूंत 95 धावांची भागीदारी करीत हिंदुस्थानी गोलंदाजांची दमछाक केली. स्टोक्सने 198 चेंडूंत 11 चौकार व 3 षटकारांसह 141 धावांची मॅरेथॉन खेळी केली. ब्रायडनने 54 चेंडूंत 3 चौकार व 2 षटकारांसह 47 धावांची झुंजार खेळी केली. या दोघांनी इंग्लंडला साडेसहाशे धावांचा टप्पा ओलांडून दिला. रवींद्र जाडेजाने स्टोक्सला सुदर्शनकरवी झेलबाद करून ही जोडी पह्डली. त्यानंतर जाडेजानेच पुढच्या षटकात ब्रायडनला सिराजकरवी झेलबाद करून इंग्लंडचा डाव संपविला. जोफ्रा आर्चर 2 धावांवर नाबाद राहिला. हिंदुस्थानकडून रवींद्र जाडेजाने सर्वाधिक 4 फलंदाज बाद केले. जसप्रीत बुमरा व वॉशिंग्टन सुंदर यांनी 2-2 बळी टिपले, तर पदार्पवीर अंशुल कम्बोज व मोहम्मद सिराज यांनी 1-1 गडी बाद केला.

स्टोक्सचे विक्रम

n बेन स्टोक्सने आपल्या अष्टपैलू कामगिरीने कारकीर्दीला आणखी एक मानाचा तुरा खोचला. एकाच डावात शतक आणि 5 बळी टिपणारा तो इंग्लंडचा पहिला कर्णधार ठरलाय.

n कसोटी क्रिकेटमध्ये 42 वर्षांनंतर एकाच डावात शतक आणि 5 बळी टिपण्याचा विक्रम कर्णधार बेन स्टोक्सने केला. याआधी पाकिस्तानच्या इम्रान खानने हा पराक्रम केला होता. त्यानेही हिंदुस्थानविरुद्धच एकाच डावात शतक आणि 5 बळी टिपले होते.

n स्टोक्सने तब्बल दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर कसोटी शतक झळकाविले. याआधी त्याने 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 155 धावांची खेळी केली होती.

n स्टोक्सने कसोटी कारकीर्दीतील 14 वे शतक झळकावित 7 हजार कसोटी धावा आणि 200 कसोटी बळींचा टप्पाही गाठला. अशी कामगिरी करणारा तो क्रिकेटविश्वातील तिसरा खेळाडू ठरलाय.