
>> संजय कऱ्हाडे
क्रिकेटचा खेळ अभूतपूर्व अनिश्चिततांनी भरलेला असतो असं म्हणतात. पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये आपल्याला या अनिश्चिततांचे भरपूर धडे मिळाले. पण आपण त्यातून काही शिकलो नाही हेच खरं. फटका खेळण्याचा प्रयत्न न करता पॅड पुढे करणाऱ्या करुण नायरला गेल्या कसोटीत पंचाने आणि मग संघ व्यवस्थापनाने शिक्षा दिली. आता तोच गुन्हा करणाऱया कप्तान गिलला पंचाने तर शिक्षा ठोठावली, पण संघ व्यवस्थापन कुठली शिक्षा देणार?
सत्र संपत आलं की बाद होण्यासाठी हिंदुस्थानी फलंदाजांची तू आधी की मी आधी अशी जणू शर्यतच लागते. आता सत्र सुरू झालं की हीच स्पर्धा सुरू होतेय अन् याच स्पर्धेत काल शुभमन एकदम पहिला आला. त्याबद्दल त्याचं मनःपूर्वक अभिनंदन.
इंग्लंडचा कप्तान बेन स्टोक्स तर क्रिकेटच्या देवाकडे नवस बोलूनच आलाय! झेल उडतात त्याच्या दिशेने. त्याची ओंजळ जणू आईच्या मायेची कुस. झेल तो सोडतच नाही. त्याने चेंडू कुठेही भिरकावलेला असो, पोचतो बरोब्बर यष्टय़ांकडे. फलंदाज धावचीत. यंदा गिल पायचीत. लॉर्ड्स कसोटीपासून तर स्टोक्स केवळ धोकादायक गोलंदाज वाटू लागलाय!
चौथ्या कसोटीची सुरुवात नेहमीसारखी झाली. गिल टॉस हरला अन् ढगाळ वातावरणात आपली फलंदाजी सुरू झाली. पहिल्या सत्रात जयस्वाल-राहुल जोडीने आपल्या अन् आपल्याही हृदयाचे ठोके न वाढवता संयतपणे फलंदाजी केली. पण पठ्ठय़ांचं जेवण झालं आणि यांच्या अंगात आलं. राहुल उशिराने स्विंग झालेल्या चेंडूवर तर जयस्वाल डॉसनच्या आर्मरला ओळखू न शकल्याने बाद झाले. राहुल अर्धशतकाच्या तोंडावर, तर जयस्वाल अर्धशतक पुरं करून.
सुदर्शन साईचा आशीर्वाद असल्यासारखा खेळतोय!
चहापानाला हिंदुस्थान 3 बाद 149 अशा परिस्थितीत असताना आपण हिंदुस्थानी क्रिकेटचे चाहते मात्र रुद्राक्षाची माळ घेऊन क्रिकेट देवाचं नाव जपत छातीचा भाता सांभाळत बसलो आहोत. आता तूच येरे बाबा, आम्ही तुझा धावा करतो, तू धावा कर अन् सोडव आम्हाला!