
हिंदुस्थान आणि इंग्लंड संघात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला यजमान संघाने जिंकला, तर दुसरा सामना हिंदुस्थानने जिंकला होता. त्यानंतर झालेल्या लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडने विजय मिळवत मालिकेत 2-1 आघाडी घेतली. त्यामुळे मॅनचेस्टर येथे होणाऱ्या चौथ्या लढतीत विजय मिळवून मालिकेत बरोबरी साधण्याचा प्रयत्न हिंदुस्थानचा असणार आहे. मात्र या लढतीपूर्वी हिंदुस्थानच्या संघाला मोठा धक्का बसला असून प्रमुख अष्टपैलू खेळाडू दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झाला आहे.
हिंदुस्थानचा स्टार अष्टपैलू खेळाडू नितीश कुमार रेड्डी याला मोठी दुखापत झाली आहे. जीममध्ये व्यायाम करत असताना त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली. त्यामुळे तो 23 जुलैपासून सुरू होणाऱ्या चौथ्या कसोटी लढतीत खेळू शकणार नाही. एवढेच नाही तर तो पुढील सामनाही खेळण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
नितीशकुमार रेड्डी याने अँडरसन-तेंडुलकर मालिकेतील दुसरा आणि तिसरा सामना खेळला आहे. लॉर्डस कसोटीत त्याने इंग्लंडच्या दोन्ही सलामीवीर खेळाडूंना झटपट बाद केले होते. त्यानंतर पहिल्या डावामध्ये 30 आणि दुसऱ्या डावात 13 धावांची खेळी केली होती. मात्र आता तो चौथ्या लढतीमध्ये खेळू शकणार नाही. त्याच्या जागी शार्दुल ठाकूर याला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
शार्दुल ठाकूर याने आतापर्यंत 12 कसोटी सामने खेळले आहेत. यात त्याने 33 विकेट्स घेतल्या आहेत. लीड्स कसोटीत तो खेळला होता. मात्र फलंदाजी आणि गोलंदाजीत तो विशेष छाप सोडू शकला नाही.