IND VS ENG TEST : इंग्रजांना पाणी पाजणारे ५ हिंदुस्थानी गोलंदाज

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

हिंदुस्थान आणि इंग्लंड संघामध्ये उद्या (१ ऑगस्ट)पासून पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेत हिंदुस्थानच्या वेगवान गोलंदाजांची कामगिरी महत्त्वाची असणार आहे. इंग्लंडमध्ये जावून धारधार गोलंदाजी करणाऱ्या काही हिंदुस्थानी गोलंदाजांवर एक नजर टाकूया…

मोहम्मद निसार –

mohammed-nisar
हिंदुस्थानचा संघ पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करत होता. तो काळ होता १९३२ चा. हिंदुस्थानचा पहिलाच दौरा इंग्लंडचा होता. उसळत्या खेळपट्ट्या आणि मुरलेले इंग्लिश खेळाडू यांच्यासमोर तसा हिंदुस्थानचा टिकाल लागणे अशक्यच होते. परंतु हिंदुस्थानकडे मोहम्मद निसार नावाचा एक वेगवान गोलंदाज होता. निसारने या दौऱ्यात आपल्या वेगाने इंग्लिश फलंदाजांना सळो की पळो करून सोडले होते. निसारने या दौऱ्यात १८.०८ च्या सरासरीने ७१ बळी घेतले होते.

इशांत शर्मा –

ishant-sharma
२०१४ ला इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलेल्या हिंदुस्थानच्या संघाचा दुसरा कसोटी सामना लॉर्डसच्या मैदानावर झाला. हा सामना जिंकण्यासाठी इंग्लंडला ३१९ धावांची आवश्यकता होती आणि १ बाद ७० धावा अशी त्यांची स्थिती होती. त्यावेळी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने मोठ्या विश्वासाने चेंडू इशांत शर्माच्या हाती सोपवला. इशांतनेही कर्णधाराचा विश्वास सार्थ ठरवत ७४ धावांत ७ बळी घेत इंग्लिश फलंदाजी कापून काढली आणि हिंदुस्थानने तब्बल २८ वर्षानंतर लॉर्डसवर विजय मिळवला होता.

कपील देव-चेतनशर्मा जोडी

kapil-dev-sharma
हिंदुस्थानला पहिला विश्वचषक जिंकून देणाऱ्या कपिल देवने १९८६ च्या इंग्लंड दौऱ्यातील पहिल्या कसोटीत लॉर्डसमध्ये ५२ धावांत ५ बळी घेतले होते. कपील देवच्या धारधार स्पेलपुढे इंग्लंडचा संघ क्रिकेटच्या पंढरीवर १८० धावांत बाद झाला होता. दुसऱ्या बाजूने कपील देवला उत्तम साथ देत चेतन शर्मानेही ६४ धावांच पाच बळी घेत दमदार कामगिरी केली होती.

श्रीनाथ-प्रसाद जोडी

srinath-vyanktesh-prasad
१९९६ ला इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या हिंदुस्थानच्या संघातील श्रीनाथ आणि प्रसाद या वेगवान जोडगोळीने इंग्लिश फलंदाजांची भंबेरी उडवली होती. या दोघांनी या दौऱ्यात एकूण २६ बळी घेतले होते. श्रीनाथचे बाऊंसर आणि प्रसादच्या स्विंगरने हा दौऱ्या चांगलाच गाजवला होता. या दौऱ्यात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजापुढे हिंदुस्थानी वेगवान गोलंदाज एक पाऊल पुढे ठरल्याचे मायकल अॅथर्टन यांनी म्हटले होते.

झहीर खान –

zaheer-khan
२००७ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर झहीर खानने जबरदस्त स्पेल टाकला होता. नॉटिंगहमच्या कसोटीमध्ये झहीरच्या ऐतिहासिक स्पेलपुढे इंग्लिश फलंदाजांनी लोटांगण घातले होते. पहिल्या डावात झहीरने ५९ धावांत चार बळी घेत इंग्लंडचा डाव १९८ धावांत गारद केला होता. त्यानंतर हिंदुस्थानने ४८१ धावा करत इंग्लंडवर २८३ धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात झहीरच्या ७५ धावांत ५ बळींच्या जोरावर इंग्लंडचा डाव ३५५ रोखण्यात हिंदुस्थानला यश आले. त्यानंतर माफक ७३ धावांचे आव्हान तीन गड्यांच्या मोबदल्यात पार करत ७ विकेटने विजय मिळवला.