असाही योगायोग! तेच मैदान, तीच तारीख व तोच विरोधी संघ; शास्त्रींनी जागवल्या आठवणी

टीम इंडिया आणि न्यूझीलंड संघामध्ये दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला उद्या शुक्रवारपासून सुरुवात होणार आहे. वेलिंग्टनच्या मैदानावर 21 फेब्रुवारी ते 25 फेब्रुवारी या कालावधीत हा सामना खेळला जाईल. टी-20 मालिका 5-0 ने जिंकल्यानंतर आणि टीम इंडियाला एक दिवसीय मालिकेत 3-0 असा पराभव स्वीकाराला लागला. त्यामुळे कसोटी मालिकेत याची परतफेड करण्याच्या इर्षेने विराटसेना मैदानात उतरेल. या लढतीपूर्वी टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी 21 फेब्रुवारी या तारखेसंदर्भात जुन्या आठवणी ताज्या केल्या आहेत.

टीम इंडियाचा मधल्या फळीतील भरवशाचा खेळाडू चेतेश्वर पुजारा याने रवी शास्त्री यांची एक छोटेखानी मुलाखत घेतली. याचा व्हिडीओ बीसीसीआयने आपल्या ट्विटर हॅन्डलवर शेअर केला आहे. माझा तर विश्वासच बसत नाहीये की मी ज्या मैदानावर 39 वर्षांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, तिथेच टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून पुन्हा सामना खेळण्यासाठी येईल, असे रवी शास्त्री म्हणाले.

रवी शास्त्री म्हणाले, मला विश्वास बसत नाहीये की मी त्याच मैदानावर, त्याच तारखेला आणि त्याच संघाविरोधात खेळण्यासाठी आलोय. मी त्याच ड्रेसिंग रुममध्ये बसलोय, काहीच बदल झालेला नाहीये. मी 39 वर्षांपूर्वी येथे पदार्पणाचा सामना खेळलो होतो. माझा अजूनही विश्वास बसत नाहीये की 39 वर्षानंतर 21 फेब्रुवारीला मी त्याच मैदानावर पुन्हा आलोय.

39 वर्षांपूर्वीच्या आठवणी ताज्या करताना शास्त्री सांगतात, कसोटी लढतीच्या आधल्या रात्री साडे नऊ वाजता मी न्यूझीलंडमध्ये पोहोचलो होतो. बापू नाडकर्णी मला विमानतळावर घ्यायला आला होता. तिथून आम्ही तडक हॉटेलमध्ये गेलो मात्र तिथे कोणीही नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी सनीने (सुनील गावसकर) नाणेफेकीचा कौल गमावला आणि आम्हाला क्षेत्ररक्षण करावे लागले. त्यामुळे मला थेट मैदानात उतरावे लागले.

पहिलाच सामना असल्याने मी त्यावेळी घाबरलो होतो. परंतु मी तिखट गोलंदाजी केली आणि मला जेरेमी कोनी याचा बळी मिळाला. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला. तुलनेने तेथे थंड हवा आणि वातावरण वेगळे होते. माझ्याकडे स्वेटरही नव्हता. मी पॉली उम्रीगार (Poly Umrigar) यांचा स्वेटर घातला होता, असेही शास्त्री म्हणाले.

ते पुढे म्हणतात, खरे तर मी ड्रेसिंग रुममधून बारे पडलो तेव्हा मला हेडली, लान्स केर्न्स, जॉन राईट, जेरेमी कोनीला पाहिले. यांच्याबाबत मी त्यावेळी फक्त रेडिओवर ऐकले होते. माझ्या संघातील काही खेळाडूंना देखील मी पहिल्यांदाच भेटत होतो. गुंडप्पा विश्वनाथ लहानपणापासून माझ्यासाठी हिरो होते. त्यांच्यासोबत सामना खेळणे अविस्मरणीय होते. तेथे सनी होता, कपिल देव होता. त्या सर्वांचे धन्यवाद, मी एका महान संघासोबत होतो, असे सांगताना शास्त्री भावूक होतात.

शास्त्रींचा पदार्पणाचा सामना
शास्त्री यांनी बरोबर 39 वर्षांपूर्वी 21 फेब्रुवारी, 1981 ला न्यूझीलंडविरुद्ध याच मैदानावर पदार्पणाचा कसोटी सामना खेळला होता. या लढतीमध्ये रवी शास्त्री यांनी पहिल्या डावात 3 आणि दुसऱ्या डावात 3 अशा एकूण 6 विकेट्स घेतल्या होत्या. न्यूझीलंडने पहिल्या डावात 375 केल्या आणि टीम इंडियाचा पहिला डाव 223 धावांमध्ये गुंडाळत 152 धावांची आघाडी घेतली. यानंतर टीम इंडियाने न्यूझीलंडचा दुसरा डाव अवघ्या 100 धावांमध्ये गुंडाळला. परंतु विजयासाठी मिळालेले 252 धावांचे आव्हान टीम इंडियाला पेलवले नाही आणि आपला डाव 190 धावांमध्ये आवरला. हा सामना टीम इंडियाने 62 धावांनी गमावला होता.

आपली प्रतिक्रिया द्या