
हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेत लखनऊत होणारा चौथा टी-20 सामना दाट धुक्यामुळे रद्द करण्यात आला होता. अत्यंत कमी दृश्यतेमुळे दोन्ही संघांना एकही चेंडू टाकणे शक्य झाले नाही. यामुळे चाहत्यांचा चांगलाच हिरमोड झाला होता. आता याबाबत मोठी अपडेट आली असून गुरुवारी उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनने तिकीटाचे पैसे परत देण्याची घोषणा केली.
बुधवारी सायंकाळी 7 वाजता हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेतील चौथा टी-20 सामना लखनऊ येथे खेळला जाणार होता. मात्र कमी दृश्यतेमुळे नाणेफक झाला नाही. त्यानंतर पंचांनी वेळोवेळी मैदानात येत पाहणी केली. एका पंचाने तर चौकोनी सीमारेषेवर जाऊन खेळपट्टीजवळ उंचावलेला पांढरा चेंडू दिसतो का, याची तपासणी केली. अशी एकूण सहा वेळा पाहणी झाल्यानंतर अखेर रात्री 9.26 वाजता सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सचिव प्रेम मनोहर गुप्ता यांनी गुरुवारी चाहत्यांचे तिकीटाचे पैसे परत करण्याची घोषणा केली. ज्या चाहत्यांनी ऑनलाईन माध्यमातून तिकीट खरेदी केले होते, त्यांना पैसे मिळवण्यासाठी वेगळ्या प्रक्रियेला सामोरे जावे लागणार नाही. सर्व चाहत्यांना ऑनलाईन पद्धतीने पैसे परत केले जातील. रिफंड बाबतची माहिती अधिकृत ईमेलवर पाठवण्यात येईल. त्यामुळे चाहत्यांनी ईमेलवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, ज्या चाहत्यांनी ऑफलाईन तिकीट खरेदी केले आहे त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. ऑफलाईन तिकीट घेणाऱ्या चाहत्यांना 20, 21 आणि 22 डिसेंबर रोजी सकाळी 11 ते सायंकाळई 6 वाजेपर्यंत इकाना आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियन, लखनऊच्या गेट नंबर 2 येथील बॉक्स ऑफिसवर बनवण्यात आलेल्या रिफंड काऊंटरवर रिफंड मिळेल. ऑफलाईन रिफंडसाठी चाहत्यांची प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य आहे. त्यांना मूळ तिकीटासह एक सरकारी ओळखपत्राची फोटोकॉपी जमा करावी लागेल. तसेच बँक खात्याच्या माहितीसह रिफंड फॉर्म मूळ तिकीटासह जमा करावा लागेल. कागदपत्रांची सत्यता तपासल्यानंतर रिफंड थेट खात्यात जमा होईल.
अहमदाबादला शुक्रवारी लढत
दरम्यान, हिंदुस्थान या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे. लखनऊमध्ये विजय मिळवून मालिका खिशात घालण्याची संधी हुकली असली तरी अहमदाबाद येथे शुक्रवारी होणाऱ्या लढतीत पाहुण्यांचा पराभव करून मालिका 3-1 ने जिंकण्याची संधी सूर्यकुमार यादवच्या संघाकडे आहे.


























































