150 पाहुणे, पीपीई कीटमध्ये सैनिक… असा असेल यंदाचा स्वातंत्र्य दिन सोहळा

856

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थान शनिवारी 74वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. दिल्ली येथील लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी ध्वजारोहण करणार आहेत. कोरोनामुळे यंदा हा समारंभही वेगळ्या पद्धतीने साजरा होणार आहे.

कोरोना संकटाच्या काळात शनिवारी साजऱ्या होणाऱ्या स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात बदल करण्यात आले आहेत. यंदाच्या कार्यक्रमात कमीत कमी पाहुणे असणार आहेत. तसंच या समारंभात नॅशनल कॅडेट कोरचे 500 विद्यार्थी सहभागी होणार आहेत. या विद्यार्थ्यांमध्ये सहा फुटांचं अंतर असणार आहे. दरवर्षी 3500 शालेय विद्यार्थी या समारंभात सहभागी होतात, त्यांना पंतप्रधानांना भेटण्याची संधीही मिळायची. पण, यंदा असं काही होणार नाही.

ध्वजवंदनासाठी ध्वज असलेल्या ठिकाणी दोन्ही बाजूंना फक्त 150 पाहुणे असतील. दरवर्षी हीच संख्या 300 ते 500 असते. तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिन्ही सैन्य दलांचे जवान गार्ड ऑफ ऑनर देतील. यात 22 जवान आणि अधिकारी सहभागी होतील. तसंच राष्ट्रीय सॅल्युट कार्यक्रमात 32 जवान आणि अधिकारी तसेच दिल्ली पोलिसांचे जवानही सहभागी असतील. कोरोनाच्या नियमावली नुसार, हे जवान चार रांगेत उभे राहतील आणि त्यांच्यात पुरेसं अंतर राखलं जाईल. जवान पीपीई कीटमध्ये असणार आहेत.

या समारंभात यंदा कोरोना वॉरियर्सही सहभागी होणार आहेत. यात दिल्ली पोलिसांचे 200 जवान, निमलष्करी दलाचे जवान आणि आरोग्य कर्मचारी सहभागी असतील. कोरोनाशी झुंज देऊन त्यावर मात करणाऱ्या काही जणांनाही या कार्यक्रमाचं आमंत्रण दिलं जाण्याची शक्यता आहे. कोरोनामुळे हा सर्व परिसर सॅनिटाईझ करण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या