‘देशात सेक्युलर सिविल कोड असला पाहिजे’- पंतप्रधान मोदी

78 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लाल किल्ल्यावरून ‘सेक्युलर सिविल कोड’ धर्मनिरपेक्ष नागरी संहितेच्या गरजेबद्दल बोलले. धर्माच्या नावावर देशाच्या ऐक्याच्या आड येणारे कायदे हटवायला हवेत, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. देशात धर्मनिरपेक्ष नागरी संहितेची गरज असून आधुनिक समाजात चुकीच्या कायद्यांना स्थान नाही, असंही प्रतिपादन पंतप्रधान मोदींनी केलं. सध्याची नागरी संहिता सांप्रदायिक नागरी संहिता असल्याचं म्हणत पंतप्रधान मोदी म्हणाले की आता आपल्याला धर्मनिरपेक्ष नागरी संहिता हवी आहे.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

नरेंद्र मोदी म्हणाले, ‘नागरिक म्हणून आपले कर्तव्य पार पाडणे हे हिंदुस्थानातील 140 कोटी जनतेचं कर्तव्य आहे आणि मला यावर बोलायचं आहे. सांप्रदायिक आणि भेदभाव करणाऱ्या कायद्यांना स्थान नाही, आम्हाला धर्मनिरपेक्ष नागरी संहिता हवी आहे.

समान नागरी संहिता म्हणजे काय?

समान नागरी संहिता (UCC) म्हणजे देशात राहणाऱ्या सर्व नागरिकांसाठी (प्रत्येक धर्म, जात, लिंगाचे लोक) समान कायदा असणे. कोणत्याही राज्यात नागरी संहिता लागू झाल्यास विवाह, घटस्फोट, मूल दत्तक घेणे आणि मालमत्तेचे विभाजन अशा सर्व विषयांमध्ये प्रत्येक नागरिकासाठी समान कायदा असेल. राज्यघटनेच्या चौथ्या भागात, राज्य धोरणाच्या निर्देशक तत्त्वांचे तपशीलवार वर्णन आहे, ज्यामध्ये अनुच्छेद 44 असे नमूद करते की सर्व नागरिकांसाठी समान नागरी संहिता लागू करणे ही सरकारची जबाबदारी आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग 11व्यांदा लाल किल्ल्यावर ध्वजारोहण केले. यादरम्यान पंतप्रधान मोदींनी लाल किल्ल्यावरून नैसर्गिक आपत्तींपासून सुधारणा आणि प्रशासन मॉडेल्सपर्यंत अनेक मुद्द्यांना हात घातला. त्यांनी 2047 पर्यंत विकसित हिंदुस्थानच्या संकल्पाबद्दल देशभरातून आलेल्या सूचनांचा उल्लेख केला.

महिलांवर अत्याचार करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण व्हावी! मोदींचं लाल किल्ल्यावरून आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ‘…मी आज पुन्हा एकदा लाल किल्ल्यावरून माझ्या वेदना व्यक्त करू इच्छितो. एक समाज म्हणून, आपल्याला महिलांवर होत असलेल्या अत्याचाराचा गांभीर्याने विचार करावा लागेल – याविरोधात संताप व्यक्त होत आहे. हा आक्रोश देश, समाज, राज्य सरकारांना गांभीर्याने घ्यावा लागेल, हे भयंकर कृत्य करणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी. समाजात असे सांगावेसे वाटते की, जेव्हा महिलांवरील अत्याचाराच्या घटना घडतात तेव्हा त्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर होते, परंतु जेव्हा अशा राक्षसी प्रवृत्तीच्या व्यक्तीला शिक्षा दिली जाते तेव्हा मात्र व्यापक चर्चा होत नाही. काळाची गरज आहे की शिक्षा भोगणाऱ्यांवर व्यापक चर्चा व्हावी जेणेकरून हे पाप करणाऱ्यांना समजेल की याची शिक्षा फाशी आहे. त्याची भीती निर्माण करणे खूप महत्वाचे आहे’.