जगातल्या टॉप-100मध्ये हिंदुस्थानची 11 विद्यापीठे

900

हिंदुस्थानची अर्थव्यवस्था जगात हळूहळू पुढे येत असतानाच जगातील सर्वोत्कृष्ट विद्यापीठांमध्ये पहिल्या 100 मध्ये हिंदुस्थानच्या 11 विद्यापीठांनी स्थान पटकावले आहे. ‘टाइम्स हायर एज्युकेशन इमर्जिंग इकॉनॉमिज विद्यापीठ रँकिंग 2020’मध्ये एकूण 47 देशांमधील 533 शैक्षणिक संस्था असून यात हिंदुस्थानची 56 विद्यापीठे आहेत. आयआयटी मुंबई या यादीत 34व्या स्थानावर आहे.

लंडनमध्ये 18 फेब्रुवारीला जारी करण्यात आलेल्या जगभरातील विद्यापीठांच्या यादीत एकूण 47 देशांमधील विद्यापीठे समाविष्ट करण्यात आली आहेत. या यादीच्या पहिल्या 100 मध्ये चीनची सर्वाधिक म्हणजे 30 विद्यापीठे समाविष्ट आहेत. इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या यादीत 16 व्या स्थानावर आहे. यानंतर आयआयटी संस्थांचा क्रम लागतो. यात आयआयटी खरगपूर 32 व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी ही संस्था 55 व्या जागी होती. आयआयटी दिल्ली यंदा 38 व्या स्थानावर आहे. गेल्या वर्षी ती 66 व्या जागी होती. आयआयटी मुंबई 34व्या स्थानावर, तर आयआयटी मद्रास यंदाच्या यादीत 63 व्या स्थानावर आहे.

दुसऱयांदा टॉप-100 मध्ये
2014 साली रँकिंगची सुरुवात झालेल्या या रँकिंगमध्ये ‘आयआयटी रोपड’, ‘इन्स्टिटय़ूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी’ आणि ‘अमृत विश्व विद्यापीठम’ यांना प्रथमच टॉप-100 मध्ये स्थान मिळाले आहे. त्यानंतर हिंदुस्थानच्या 11 शैक्षणिक संस्था दुसऱ्यांदा टॉप-100 मध्ये आल्या आहेत.

जागतिक रँकिंगमध्ये हिंदुस्थानी विद्यापीठांच्या यशाबाबत बऱयाच काळापासून चर्चा सुरू आहे. कारण आतापर्यंत या विद्यापीठांनी जास्त चांगले काम केले नव्हते. पण आता टॉप-100 मध्ये हिंदुस्थानातील 11 विद्यापीठे समाविष्ट झाल्यामुळे त्यांच्यासाठी हा एक टर्निंग पॉइंट सिद्ध होऊ शकेल. – फिल बॅटी, चीफ नॉलेज ऑफिसर, टीएचई

आपली प्रतिक्रिया द्या