नरेंदर भी गायब, सिलेंडर भी गायब! LPG तुटवड्यावरून संसद परिसरात इंडिया आघाडीच्या खासदारांचे जोरदार निदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील एलपीजी तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी संसदेच्या आवारात इंडिया आघाडीच्या खासदारांनी एकत्र येत केंद्र सरकारचा तीव्र निषेध केला. मध्य पूर्वेत इराण, इस्रायल आणि अमेरिकेमध्ये सुरू असलेल्या संघर्षामुळे उद्भवलेल्या ऊर्जा संकटामुळे इंधन पुरवठा विस्कळीत झाल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले.

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि समाजवादी पार्टीचे खासदार धर्मेंद्र यादव यांच्यासह नेते संसदेच्या ‘मकर द्वार’ येथे जमा झाले. या आंदोलनामध्ये डीएमके, जेएमएम आणि सीपीआय-एमएल पक्षाचे खासदारही सहभागी झाले होते.”रिकामे सिलिंडर, खोटी आश्वासने (Empty Cylinders, Empty Promises) असा मजकूर असलेला मोठा बॅनर हातात धरून खासदारांनी सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केली.

…तर तुमच्या घरचा LPG सिलिंडरचा पुरवठा बंद होणार; केंद्र सरकारचा मोठा आदेश, बुकिंगबाबतही दिलं स्पष्टीकरण

देशभरात स्वयंपाकाच्या गॅसचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून ग्राहकांना चढ्या दराने सिलिंडर विकले जात आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी संसदभवन परिसरात आंदोलन करून सरकारला जाब विचारला. या आंदोलनात सहभागी होत नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडे लक्ष वेधले. तसेच गॅस पुरवठा तात्काळ सुरळीत करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली, असे ट्विट खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.