टीम इंडियाचा सूर्यास्तापूर्वीच पराभव! ऑस्ट्रेलियाने 55 मिनिटे 66 चेंडूंतच साकारला विजय

दुसऱ्या दिवस-रात्र एकदिवसीय क्रिकेट सामन्यात यजमान टीम इंडियावर सूर्यास्तापूर्वीच पराभवाची नामुष्की ओढावली. पाहुण्या ऑस्ट्रेलियाने केवळ 55 मिनिटांत आणि फक्त 66 चेंडूंत एकही फलंदाज न गमविता विजयाची औपचारिकता पूर्ण केली. एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील हिंदुस्थानचा हा सर्वात लाजिरवाणा पराभव ठरला. मिचेल स्टार्कने 5 बळी टिपत हिंदुस्थानी फलंदाजीला भगदाड पाडले. त्याच्या बळीच्या ‘पंच’मुळे हिंदुस्थानची 117 धावांत दाणादाण उडाली. ऑस्ट्रेलियाने 11 षटकांतच बिनबाद 121 धावा करीत विजयाला गवसणी घातली. या विजयासह ऑस्ट्रेलियाने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली. 5 बळी टिपणारा मिचेल स्टार्क या विजयाचा शिल्पकार ठरला. आता या मालिकेचा फैसला बुधवारी (दि. 22) रोजी चेन्नईत होणार आहे.

ऑस्ट्रेलियाचा ‘दस’ का दम
हिंदुस्थानकडून मिळालेले 118 धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियाने दहा गडी राखून सहज पार केले. ट्रेव्हिस हेड (नाबाद 51) व मिचेल मार्श (नाबाद 66) यांनी दणकेबाज अर्धशतके ठोकून एकदिवसीय क्रिकेटमधील एक रुबाबदार विजय मिळविला. या दोघांनी 66 चेंडूंत 121 धावांची अभेद्य सलामी देत हिंदुस्थानला धूळ चारली. हेडने 30 चेंडूंच्या खेळीत 10 चेंडू सीमापार पाठविले. मार्शने 36 चेंडूंच्या खेळीत 6 षटकार व तितक्याच चौकारांचा घणाघात केला. हिंदुस्थानने ऑस्ट्रेलियाची सलामीची जोडी फोडण्यासाठी पाच गोलंदाज वापरले, पण काही उपयोग झाला नाही.

कोहली, जाडेजा, अक्षरचा प्रतिकार
मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीपुढे हिंदुस्थानचे स्टार फलंदाज गार पडत असताना विराट कोहली (31), रवींद्र जाडेजा (16) व अक्षर पटेल (नाबाद 29) यांनी काही वेळ ऑस्ट्रेलियन गोलंदाजीचा प्रतिकार केला. नाथन इलिसने कोहली, जाडेजा यांना बाद करून हिंदुस्थानच्या फलंदाजीतील हवा काढून घेतली. 16व्या षटकांत कोहली पायचीत झाला, तर 20व्या षटकांत जाडेजाने यष्टीमागे ऍलेक्स कॅरीकडे झेल दिला. कुलदीप यादव (4), मोहम्मद शमी (0) यांना एबोटने बाद केले, तर मिचेल स्टार्कने एका अप्रतिम चेंडूवर मोहम्मद सिराजची दांडी गुल करून हिंदुस्थानचा डाव संपविला. आजच्या लढतीचा हिरो ठरलेल्या मिचेल स्टार्कलाच लागोपाठ 2 षटकार ठोकून प्रेक्षकांची वाहवाह मिळविणाऱया अक्षर पटेलने 29 चेंडूंत 2 षटकार व एका चौकारासह नाबाद 29 धावांची खेळी केली. स्टार्कने सर्वाधिक 5 फलंदाज बाद केले. सीन एबोटला 3, तर नाथनला 2 बळी मिळाले. हिंदुस्थानच्या चार फलंदाजांना भोपळाही फोडता आला नाही, तर 3 फलंदाज एकेरी धावेवर बाद झाले.

हिंदुस्थानी स्टार, स्टार्कपुढे गार
नाणेफेकीचा कौल गमावून प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या हिंदुस्थानला पहिल्या पाच षटकांतच तीन धक्के बसले. मिचेल स्टार्कने तिसऱ्याच चेंडूंवर शुभमन गिलला खातेही उघडू न देता लाबूशेनकरवी झेलबाद करून ऑस्ट्रेलियाला झोकात सुरुवात करून दिली. स्टार्कनेच पाचव्या षटकांत दुसरा आघाडीवीर रोहित शर्मा (13) व सूर्यकुमार यादव (0) यांना लागोपाठच्या चेंडूंवर बाद करून हिंदुस्थानची 3 बाद 32 अशी दुर्दशा केली. रोहितचा कर्णधार स्मिथने सूर मारून झेल पकडला. तर पुढच्याच चेंडूवर सूर्याही पायचीत झाला. मग स्टार्कने नवव्या षटकांत राहुलला पायचीत पकडून हिंदुस्थानची आघाडीची फळी कापून काढली. मग एबोटच्या गोलंदाजीवर पंडय़ाही (1) स्मिथकरवी झेलबाद झाल्याने 10 षटकांतच हिंदुस्थानचा निम्मा संघ तंबूत परतला.

दृष्टिक्षेपात…
– ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानवर 234 चेंडू राखून विजय मिळविला. याआधी, 2019मध्ये न्यूझीलंडने हॅमिल्टनमध्ये 212 चेंडू राखून हिंदुस्थानवर विजय मिळविला होता. न्यूझीलंडचा विक्रम ऑस्ट्रेलियाने मोडीत काढला.
– एकदिवसीय क्रिकेटमध्ये प्रतिस्पर्धी संघाने एकही फलंदाज न गमविता हिंदुस्थानवर मिळविलेला हा सहावा विजय होय.
– मिचेल स्टार्कने एकदिवसीय क्रिकेटमध्ये नवव्यांदा 5 बळी टिपण्याची किमया केली. त्याने ब्रेट लीचा विक्रम मोडला. ब्रेट लीने 217 सामन्यांत 9 वेळा 5 बळी टिपले. मात्र स्टार्कने 109 लढतीतच हा पराक्रम केला आहे.
– हिंदुस्थानने 10 षटकांत 5 गडी गमावून 11 वर्षांपूर्वीच्या नकोशा विक्रमाची पुनरावृत्ती केली. पाकिस्तानने 2012मध्ये चेन्नईत 10 षटकांत हिंदुस्थानचे 5 फलंदाज बाद केले होते.
– हिंदुस्थानवर दोनदा 10 गडी राखून विजय मिळविणारा ऑस्ट्रेलिया पहिलाच संघ ठरला.