
हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना विशाखापट्टणम येथे खेळला गेला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानचा 10 गडी राखून पराभव केला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे. मालिकेतील पहिला सामना हिंदुस्थानने 5 विकेटने जिंकला होता. मात्र दुसऱ्या सामन्यात हिंदुस्थानी संघ 26 षटकात केवळ 117 धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेडच्या धडाकेबाज फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाने 11 षटकांत हा सामना जिंकला.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र या सामन्यात मिचेल स्टार्कने गोलंदाजीमध्ये आपला दबदबा दाखवत 5 विकेट घेतल्या. त्यामुळे हिंदुस्थानी संघ केवळ 26 षटकांत 117 धावा करून ऑलआऊट झाला. हिंदुस्थानकडून विराट कोहलीने सर्वाधिक 31 धावा केल्या व ऑस्ट्रेलियासमोर 118 धावांचे लक्ष्य ठेवले
हिंदुस्थानने दिलेल्या 118 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी हिंदुस्थानी गोलंदाजांचा अक्षरशः बँड वाजवला. दोन्ही सलामीवीरांनी एकही विकेट न गमावता दमदार फलंदाजी करत अवघ्या 11 षटकांत सामना जिंकला. ट्रॅव्हिस हेडने 51 आणि मार्शने 66 धावा केल्या. दोन्ही फलंदाज नाबाद माघारी परतले.