हिंदुस्थानचा ‘मास्टर स्ट्रोक’, चीनला जोरदार दणका, ऑस्ट्रेलियासोबत 7 महत्वपूर्ण करार

2590

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्यात व्हर्च्युअल बैठक झाली. यावेळी दोन्ही देशांना एकमेकांचे लष्करतळ वापरण्यासह महत्त्वपूर्ण करार झाले आहेत. दरम्यान या करारांमुळे कुरापतखोर चीनला जोरदार दणका दिल्याचे सांगितले जात आहे.

ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन मे महिन्यात हिंदुस्थान दौऱयावर येणार होते. कोरोना महामारीमुळे त्यांचा दौरा रद्द झाला. त्यामुळे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दोन्ही पंतप्रधानांमध्ये व्हर्च्युअल परिषद झाली. अशाप्रकारे परिषद होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दरम्यान यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कोरोना हे संकट असले तरी, दोन्ही देशांमध्ये सामंजस्य करार आणि मैत्रीपूर्ण संबंध आणखी दृढ करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगितले. ऑस्ट्रेलियातील हिंदुस्थानी नागरिक आणि विद्यार्थ्यांची काळजी घेतली जात असल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मॉरिसन यांचे आभार मानले.

काय आहेत करार
संरक्षण, आरोग्य, विज्ञान-तंत्रज्ञान, शिक्षण, उद्योग-व्यापार आदी सात महत्त्वपूर्ण करार झाले.

संरक्षण करार दोन्ही देशांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मानला जातो. हिंदुस्थान आणि ऑस्ट्रेलिया एकमेकांच्या लष्करीतळाचा वापर करू शकणार आहे. लढाऊ विमाने एकमेकांच्या तळावर उतरू शकतील. तसेच गरज असल्यास इंधनही भरता येणार आहे.

हिंद महासागरात चीनचा हस्तक्षेप वाढला आहे. चीनला रोखण्यासाठी हिंदुस्थान-ऑस्ट्रेलिया एकत्र आल्याचे सांगण्यात येते. हिंद महासागरात ऑस्ट्रेलियाच्या सीमेजवळ चीनकडून नौदलाचा तळ बनविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. हे प्रयत्न हाणून पाडण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे.

अणवस्त्र पुरवठा गटामध्ये हिंदुस्थानचा समावेश करण्यासाठी ऑस्ट्रेलियाने पाठींबा दिला आहे.

खिचडी आणि समोसा
या चर्चेवेळी पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी कोरोना संकट संपल्यानंतर आपण जेव्हा हिंदुस्थानात येईल तेव्हा गुजराती खिचडी खावू, असे सांगितले. तसेच आपल्या स्वयंपाकघरात खिचडी बनविण्याचा प्रयत्न करेल असे ते म्हणाले. त्यावर पंतप्रधान मोदी हसले आणि म्हणाले, हिंदुस्थानात आल्यानंतर नक्कीच खाऊ घातली जाईल. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी मॉरिसन यांना समोसा खाण्याचे निमंत्रण दिले होते. त्यावर आपण नक्कीच समोसा खाऊ, असे ट्विट मॉरिसन यांनी केले होते.

आपली प्रतिक्रिया द्या