वानखेडेवर विजयाचा ‘रवी’ तळपला! मिशन वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानचा विजय आरंभ

आपल्या सातत्यपूर्ण निराशाजनक कामगिरीमुळे संघातून डच्चू मिळालेल्या केएल राहुलने आज यष्टिरक्षक म्हणून संघात स्थान मिळवत दोन झेल तर टिपलेच, पण संकटात सापडलेल्या संघासाठी रवींद्र जाडेजासोबत अभेद्य शतकी भागी रचत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या वनडेत हिंदुस्थानच्या मिशन वर्ल्डकपचा विजयाने प्रारंभ केला. मोहम्मद शमीने आपल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर ऑस्ट्रेलियन डावाला 188 धावांत गुंडाळण्याच्या केलेल्या कामगिरीवर राहुल आणि जाडेजाच्या अष्टपैलू खेळीने विजयावर कळस चढवला आणि अखेर वानखेडेवर 11 वर्षांनी जाडेजाच्या कृपेने विजयाचा ‘रवी’ तळपला.

हिंदुस्थानचा डावही गडगडला

ऑस्ट्रेलियाचे 189 धावांचे आव्हान माफक वाटलेच नाही. मिचेल स्टार्कने आपल्या गोलंदाजीत दाखवलेल्या स्पार्कने हिंदुस्थानची आघाडीची फलंदाजी अक्षरशः कोलमडली. त्याने गिल (20), कोहली (4) आणि सूर्यकुमार (0) यांना बाद करत हिंदुस्थानची 4 बाद 39 अशी केविलवाणी अवस्था केली होती. मात्र त्यानंतर फलंदाजीस आलेल्या केएल राहुलने आधी हार्दिक पंडय़ाबरोबर 44 धावांची भागी रचून संघाची पडझड रोखली. पंडया 25 धावांवर बाद झाला तेव्हा हिंदुस्थान विजयापासून 106 धावा दूर होता. हिंदुस्थानसाठी हे लक्ष्य अवघड होते, पण राहुल आणि जाडेजाने चिवट आणि झुंजार खेळ करीत 20 षटकांत 108 धावांची अभेद्य भागी रचत हिंदुस्थानच्या झुंजार विजयावर शिक्कामोर्तब केले. राहुलने 75 धावा केल्या, तर जाडेजाने गोलंदाजीत 2 विकेट टिपल्यानंतर 45 धावांची जबरदस्त खेळीही केली. तो ‘सामनावीर’ पुरस्काराचाही मानकरी ठरला.

वानखेडेवर पराभवाची मालिका खंडित

23 ऑक्टोबर 2011 रोजी हिंदुस्थानने वानखेडेवर इंग्लंडचा 6 विकेटने पराभव केला होता. त्यानंतर गेल्या 11 वर्षांत हिंदुस्थान 3 वनडे खेळला होता आणि तिन्ही वनडेत हार सहन करावी लागली होती. 2015 मध्ये दक्षिण आफ्रिकेने हिंदुस्थानचा 214 धावांनी धुव्वा उडवला होता, तर 2017 मध्ये न्यूझीलंडनेही मात केली होती. तसेच 2020 साली ऑस्ट्रेलियाने 255 धावांचे आव्हान बिनबादच गाठत हिंदुस्थानची धुळधाण उडवली होती. अशा मानहानिकारक पराभवानंतर अखेर आज हिंदुस्थानने वानखेडेवर विजयाची नोंद केली.

59 धावांत 8 फलंदाज धारातीर्थी

ऑस्ट्रेलियन संघ सुस्थितीत होता. मिचेल मार्शचा झंझावात पाहून ऑस्ट्रेलिया 350 धावांचा पल्ला गाठणार असे अंदाज बांधले जात होते तेव्हाच मार्श पह्डणी देत असलेल्या धावांच्या पंचपक्वान्नात मिठाचा खडा पडला. रवींद्र जाडेजाला चौकार ठोकल्यानंतर पुढच्या चेंडूला पुन्हा एकदा मारण्यासाठी पुढे सरसावलेला मिचेल मार्श चुकला. तो सिराजच्या हातात झेल देऊन परतला. मार्शचे बाद होणे ऑस्ट्रेलियाला भलतेच महागात पडले. 2 बाद 129 धावांवर असलेल्या पाहुण्यांना तिसरा धक्का बसला आणि त्यानंतर त्यांना ठरावीक अंतराने धक्के बसतच गेले. जोस इंगलीस (26) आणि पॅमेरून ग्रीन (12) या दोघांनाच दोन अंकी धावसंख्या गाठता आली. त्यांचे अन्य फलंदाज झटपट बाद झाल्यामुळे 16 षटकांत त्यांनी 59 धावांच्या मोबदल्यात 8 फलंदाज गमावले. परिणामतः त्यांचा पूर्ण संघ दोनशे धावांचा पल्लाही गाठू शकला नाही.

मिचेल मार्शने धुतले

ऑस्ट्रेलियन फलंदाजीला खरे बळ लाभले ते मिचेल मार्शच्या घणाघाती फलंदाजीचे. त्याने संघाच्या डावाचा मजबूत पाया करण्याचा प्रयत्न करताना हिंदुस्थानी गोलंदाजांवर जोरदार हल्ले चढवले. त्याने आपल्या 99 मिनिटांच्या खेळीत 5 उत्तुंग षटकार आणि 10 चौकारांची आतषबाजी करताना 65 चेंडूंत 81 धावा चोपून काढल्या. त्याने स्मिथसह 72 तर लाबुशेनबरोबर 52 धावांची भागी रचली. मात्र मार्श बाद झाल्यानंतर त्यांचा एकही फलंदाज मैदानावर नीट उभाही राहू शकला नाही.

संक्षिप्त धावफलक

ऑस्ट्रेलिया ः 35.4 षटकांत सर्व बाद 188 (मिचेल मार्श 81, स्टिव्हन स्मिथ 22, जोश इंगलीस 26 ; मोहम्मद शमी 6-2-17-3, मोहम्मद सिराज 5.4-1-29-3, रवींद्र जाडेजा 9-0-46-2) हिंदुस्थान ः 39.5 षटकांत 5 बाद 191 (शुभमन गिल 20, केएल राहुल ना. 75, हार्दिक पंडय़ा 25, रवींद्र जाडेजा ना. 45 ; मिचेल स्टार्क 9.5-0-49-3, मार्कस स्टॉयनिस 7-1-27-2)

शमी-सिराजचे वादळ

मिचेल मार्श आणि मार्नस लाबुशेन बाद झाल्यावर ऑस्ट्रेलियन संघ हादरला. पण डावाची 28 षटके शिल्लक असल्यामुळे त्यांना सावरण्याची भरपूर संधी होती. जोस इंगलीस आणि पॅमेरून ग्रीन डावाला सावरत असल्याचे चित्र दिसत असतानाच शमी नावाचे वादळ घोंगावले. त्याने आपल्या 5 भेदक चेंडूंत इंगलीस आणि ग्रीनचे त्रिफळे उद्ध्वस्त करत ऑस्ट्रेलियन डावालाच सुरुंग लावला. मग त्याने पुढच्याच षटकात मार्कस स्टॉयनीसला बाद करून ऑस्ट्रेलियाच्या शेवटच्या आशास्थानालाही तंबूत धाडले. शमीने आपल्या तीन षटकांत 8 धावा देत 3 विकेटस् टिपल्या. शेवटची दोन्ही षटके निर्धाव टाकत 2 विकेटस् टिपण्याचीही किमया शमीच्या भेदक गोलंदाजीने करून दाखवली. मग शेवटचे दोन फलंदाज सिराजने बाद करत ऑस्ट्रेलियाचा डाव 188 धावांवरच गुंडाळला.