पाकिस्ताननंतर हिंदुस्थानने चीनकडे मोर्चा वळवला; उचलले महत्त्वाचे पाऊल

china x ban

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर हिंदुस्थानने सीमेपलीकडून सुरू असलेल्या अतिरेकी तळांना लक्ष्य केले. त्यासोबतच इंटरनेटवरून पसरवल्या जाणाऱ्या खोट्या बातम्यांना रोखण्याची कारवाई केली आहे. हिंदुस्थानी लष्कराकडून सुरू असलेल्या दहशतवादविरोधी कारवाई ‘ऑपरेशन सिंदूर’बाबत ‘खोटी माहिती’ पसरवल्याप्रकरणी ‘ग्लोबल टाइम्स’ आणि चीनचे सरकारी वृत्तसंस्था ‘शिन्हुआ’चे एक्स अकाउंट ब्लॉक करण्यात आले आहे.

ग्लोबल टाइम्स हे चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या मालकीच्या पीपल्स डेलीचे एक इंग्रजी टॅब्लॉइड वृत्तपत्र आहे, तर शिन्हुआ ही चीनची अधिकृत वृत्तसंस्था आहे.

या आठवड्याच्या सुरुवातीला बीजिंगमधील हिंदुस्थानी दूतावासाने लष्करी कारवाईच्या कव्हरेजबद्दल ग्लोबल टाइम्सला इशारा देऊन जाहीर निषेध केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आले. ‘@globaltimesnews अशा प्रकारची चुकीची माहिती पसरवण्यापूर्वी तुम्ही तथ्यांची पडताळणी करा आणि तुमच्या स्रोतही तपासून घ्या’, असं दूतावासाने एका पोस्टमधून म्हटलं आहे.

हिंदुस्थानी दूतावासाने स्पष्ट केलं आहे की पाकिस्तानला सहानुभूती देणारे अनेक सोशल मीडिया अकाउंट हिंदुस्थानच्या लष्कराच्यासंदर्भात खोट्या बातम्या प्रसारित करत होते.