चीनची नजर लडाखमधील सोन्यावर; हिंदुस्थानी हद्दीत घुसखोरीचा डाव

4529

हिंदुस्थान आणि चीनदरम्यान लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील तणाव वाढला आहे. या सीमाभागाबाबत दोन्ही देशात वाद आहेत. आता चीनच्या सैनिकांनी गलवान रिजनमध्ये तीन ठिकाणी घुसखोरी केली आहे. चीनचे सैनिक पेगाँग झऱ्याजवळील फिंगर एरियामध्ये बंकर बनवत असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे फक्त घुसखोरी किंवा या भागावर ताबा मिळवण्याव्यतिरिक्त चीनचा वेगळाच मानस असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. लखाडमध्ये मोठ्या प्रमाणात खनिज संपत्ती आणि सोन्याची खाण असण्याची शक्यता असल्यानेच या भागावर चीनचा डोळा आहे.

प्राचीन काळात उंट आणि घोड्याद्वारे चीनशी व्यापार होत होता. लेहच्या मार्गाने घोडे आणि उंट चीनच्या यारकंद, सिनकिआंग आणि तिबेटची राजधानी ल्हासापर्यंत जात होते. त्यामुळे लेह-लडाखाचे भौगोलिक महत्त्व आहे. गलवान रिजन भागाबाबत दोन्ही देशात वाद आहे, या भागाजवळच गोगरा पोस्ट आहे. तेथे गोल्डन माऊंटन नावाचा पर्वत आहे. दोन्ही देशातील तणावामुळे या भागात जास्त सर्वेक्षण झालेले नाही. माय़त्र, या भागात मोठ्या प्रमाणात सोनं आणि इतर धातूंच्या मोठ्या खाणी असल्याची शक्यता आहे. लडाखच्या काही भागात चांगल्या दर्जाचे युरेनियमचे साठे सापडले आहेत. त्यामुळे या भागावर चीनने लक्ष केंद्रीत केले आहे.

जर्मनीतील एका प्रयोगशाळेत 2007 येथील मातीचे परीक्षण करण्यात आले होते. तेव्हा येथे युरेनियमचा साठा असल्याचे स्पष्ट झाले होते. लडाखच्या पर्वतरागांमध्ये युरेनियमचा साठा असल्याचे संशोधकांचे मत आहे. तसेच हा साठा 25 ते 100 दशलक्ष वर्षे जुना आहे. तर आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडमध्ये असणार युरेनियमचे साठे 2500 ते 3000 वर्षे जुने आहेत. त्यामुळे लडाखमधील साठ्याचा दर्जा चांगला आहे. तसेच हा साठा कोहिस्तान, लडाखपासून दक्षिण तिबेटपर्यत पसरलेला आहे.

अरुणाचल प्रदेशच्या सुंबसुरी जिल्ह्यापासून 15 किलोमीटरच्या अंतरावर सोनं आणि खनिजसंपत्तीच्या शोधसाठी चीनने उत्खनन करून सर्वेक्षण केले आहे. तिबेटच्या युलमेडमध्ये सोन्याचा साठा असल्याचा अंदाज आहे. तसेच करण्यात आलेल्या सर्वेक्षणातून या भागात सोनं, चांदी आणि खनिज संपत्तीचा मोठा साठा आहे. त्यासाठी चीनने अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ मोठ्या प्रमाणात वाहतुकीचे जाळे तयार केले आहे. तसेच अद्ययावत उपकरणांचा वापर करून खनिज संपत्ती मिळवण्याचा चीनचा मानस आहे. त्यासाठी चीन अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी करत आहे. कोरोनामुळे अर्थव्यवस्था डबघाईला आल्याने चीनची नजर लडाखमधील सोन्यावर आहे. तसेच आता अमेरिकेशी तणाव वाढत असल्याने येथील युरेनियमचा साठ्यावरही त्यांचा डोळा आहे. त्यासाठीच चीनने घुसखोरी करून बंकर बनवल्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या