चीनचे सैन्य लडाखमध्ये 2 किलोमीटर मागे सरकले, ‘ही’ आहेत तीन प्रमुख कारणं..

6854

लडाखमध्ये हिंदुस्थानच्या भूभागावर कब्जा करण्याच्या दृष्टीने गलवान खोरे आणि पेंग्यांग सरोवर परिसरात डेरा टाकलेले चीनचे सैन्य 2 किलोमीटर मागे सरकले आहे. ‘एलएसी’ हजारो सैनिकांच्या तैनातीनंतरही चीनला हिंदुस्थानने मागे सरकण्यास मजबूर केले. तसेच आतापर्यंत हिंदुस्थानला धमक्या देणारा चीन गेल्या 2 ते 3 दिवसांपासून शांततेसाठी प्रयत्नशील आहे.

गेल्या 1 महिन्यापासून या भागात तणाव होता. दोन्ही सैन्य फक्त 500 मीटरवर आमनेसामने आले होते. आता चीनने सैन्य मागे घेतल्याने येथील तणाव निवळण्यास सुरुवात होईल. मात्र आक्रमक रूप धारण केलेल्या चीनला मागे का सरकावे लागले? हिंदुस्थानने अशी कोणती चाल खेळली? तणाव असणाऱ्या भागात गेल्या काही दिवसात नक्की काय घडामोडी घडल्या. जाणून घेऊया…

आंतरराष्ट्रीय प्रकरणाचे तज्ञ कमर आगा यांनी ‘नवभारत टाइम्स’शी बोलताना या सर्व घटनेमागील कारण सांगितले. ‘लडाखसह हिंदुस्थानशी लागून असलेल्या सीमेवर चीन इंच इंच पुढे सरकण्याची रणनीती वापरत आहे. चीनने लडाखमध्येही हीच रणनीती वापरली. डोकलाम प्रमाणे चीनने इथेही घुसखोरी करून कब्जा करण्याचा प्रयत्न केला, मात्र तोंडावर आपटला, असे कमर आगा म्हणाले.

चीनला आपली पावले मागे घ्यावी लागली याला तीन कारणे आहेत. पहिले म्हणजे हिंदुस्थानच्या लष्कराने या भागात जोरदार तयारी केली. लडाखमध्ये गेल्या महिन्यात 5 तारखेला आणि सिक्कीममध्ये 9 तारखेला चिनी आणि हिंदुस्थानी सैन्यात झडप झाली होती. सिक्कीमचा वाद पुढे वाढला नाही, मात्र लडाखमध्ये गलवान खोरे आणि पेंग्यांग सरोवर जवळ चीनने आक्रमक रूप घेत दबावाने राजकारण करत सैन्य संख्या वाढवली. चीनने जवळपास 5 हजार सैन्य तैनात केले. चीनच्या या कुरापतीला हिंदुस्थानने प्रत्युत्तर देत एलएसीव आपले सैन्य वाढवले, तसेच हत्यार, टॅन्क आणि युद्ध वाहनांना तैनात केले. एवढ्या तयारीनंतरही हिंदुस्थानने संयम दाखवत चर्चा सुरू ठेवली. 6 जूनला दोन्ही देशांच्या लेफ्टनंट जनरल रँकच्या अधिकाऱ्याचा चर्चा झाली. या नंतर जवळपास 10 वेळा बैठका झाल्या. मात्र हिंदुस्थान मागे हटला नाही आणि चीनला नमते घ्यावे लागले.

maxresdefault

चीनला मागे हटावे लागले याला दुसरे कारण म्हणजे अंतर्गत संकट हे आहे. कोरोना विषाणूमुळे चीनची अर्थव्यवस्था संकटात असून भीषण मंदी आहे. जगाचा उत्पादन ‘कारखाना’ असलेल्या चीनची निर्यात कमी झाली आहे. यामुळे बेरोजगारी वाढली असून नागरिकांत असंतोष वाढत आहे. यामुळे चीनने राष्ट्रवादाचे कार्ड खेळले. अमेरिकेमुळे दक्षिण चीन सागर आणि तैवानमध्ये चीनला जास्त काही करता येत नाहीये. त्यामुळे चीनने हिंदुस्थानकडे मोर्चा वळवला. मात्र इथेही ते तोंडावर पडले.

india-china-soldier

तिसरे कारण म्हणजे जगभरातून चीनवर दबाव वाढत आहे. दक्षिण चीन समुद्र, कोरोना, अमेरिकेसोबत सुरू असलेले व्यापार युद्ध आणि हाँग काँगमधील दडपशाही यामुळे चीनला जगभरात विरोध होतोय. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जी-7 ग्रुपचा विस्तार करत त्यात हिंदुस्थानला सहभागी करण्याचा पण केला. तसेच जपान, व्हिएतनाम, ऑस्ट्रेलिया आणि तैवान चीनच्या साम्राज्यवादी भूमिकेचा कडाडून विरोध करत आहे. चारही बाजूने घेरला गेल्याने प्रचंड सैन्यबळ असणाऱ्या हिंदुस्थानशी टक्कर घेण्यास चीन घाबरला. यासह हिंदुस्थानमधील नागरिकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार करण्याची मोहीम चालवली. हिंदुस्थान सारखी बाजारपेठ गमावण्यात काही हाशील नाही हे चीनने ओळखले आणि माघार घेतली, असे आगा म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या