तीन हवाईतळ आणि पाच हेलीपोर्ट… चीनच्या सीमेजवळील नव्या लष्करी तळांमुळे वाढला तणाव…

चीनशी सीमावादावरून असलेला तणाव कमी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, त्यातून काहीही निष्पन्न होत नाही. चीनकडून करण्यात येणाऱ्या कुरघोडी पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त होत आहे. 2017 मध्ये झालेल्या डोकलाम वादानंतर चीनने एलएसीवरील आपले लष्करी तळ बळकट करण्यास सुरुवात केली होती. याबाबतची माहिती एका अहवालातून मिळाली आहे. चीनने 2017 नंतर एकूण 13 लष्करी तळ उभारण्याचे काम सुरू केले. त्यात तीन हवाईतळ, पाच संरक्षक तळ आणि पाच हेलिपोर्टचा समावेश आहे. एका आंतरराष्ट्रीय एजन्सीने (stratfor) हिंदुस्थान-चीन सीमारेषेबाबत (एलएसी) एक अहवाल सादर केला आहे. त्यात याबाबतची माहिती देण्यात आली आहे. चीनच्या या लष्करी हालचालींमुळे दोन्ही देशात तणाव वाढल्याचे म्हटले आहे.

डोकलाम वादानंतर सीमाभागात चीनच्या हालचाली वाढल्या आणि त्यांनी वेगाने लष्करी तळ आणि इतर हवाई तळ उभारण्याच्या कामाला सुरुवात केल्याचे अहवालात म्हटले आहे. तसेच लडाखमध्ये सुरू झालेल्या वादानंतर चीनने चार नवे हेलिपोर्ट उभारले आहेत, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे. डोकलाम वादानंतर चीनला हिंदुस्थानची भूमिका आणि क्षमता यांचा अंदाज आला. त्यानंतर त्यांनी सीमाभागात हालाचाली वाढवत सैन्य मजबुतीकडे लक्ष केंद्रीत केले. त्यामुळे तीन वर्षात चीनने सीमाभागात लष्करी तळ,सैन्य चौक्या, रस्ते उभारत शस्त्रसाठा, लष्करी वाहनांच्या वाहतुकीची सोय केली. त्याचा चीनला खूप फायदा होत असून त्याचे परिणाम आगामी काळात दिसतील, असे अहवालात नमूद केले आहे. तसेच अजूनही सीमाभागात चीनच्या हालचाली सुरू असल्याचे अहवालात म्हटले आहे.

हिंदुस्थानी हवाई दलात राफेल दाखल झाल्याने हवाई दलाचे सामर्थ्य वाढले आहे. मात्र, डोंगराळ भागातील युद्धासाठी आणि या भागातील युद्धतंत्रासाठी हिंदुस्थानी सैन्याला मेहनत घ्यावी लागणार आहे. तसेच वाढत्या थंडीमुळे आणि हिमवृष्टीने रस्ते बंद झाल्यावर हिंदुस्थानी जवानांपर्यंत रसद पोहचवण्याचे आव्हानही सैन्यदलासमोर आहे. चीनच्या सीमाभागातील हालाचालींवर आणि चीनकडून उभारण्यात येणाऱ्या तळांवर हिंदुस्थानचे लक्ष आहे. या बांधकामाला हिंदुस्थानने विरोध केल्यावर तणावाला सुरुवात झाल्याचे अहवलात म्हटले आहे. हे तळ चीनच्या सैन्याचे मोठे बलस्थान ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. चीनच्या या लष्करी तळांच्या उभारणीमुळे हिंदुस्थानसमोर मोठे आव्हान आहे. लडाख सीमेवरील तणाव 1962 च्या युद्धानंतर दोन्ही देशात निर्माण झालेला मोठा तणाव आहे. लडाखप्रमाणेच सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेशच्या काही भागांवर चीन दावा करत असल्याने त्यावरूनही दोन्ही देशात वाद आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या