‘एलएसी’वर स्टॅण्डऑफ कायम; हिंदुस्थान-चीन लष्करी अधिकाऱ्यांची 5 तास बैठक

688

कुरापतखोर चीनमुळे निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठीचे प्रयत्न सुरूच आहेत. दोन्ही देशांच्या लेफ्टनंट जनरल पदांवरील अधिकाऱ्यांची तब्बल पाच तास बैठक झाली. दीर्घ चर्चेनंतरही लाईन ऑफ ऍक्च्युअल कंट्रोल (एलएसी) येथील तणाव कायम असल्याचे वृत्त आहे.

कोरोनाविरुद्ध लढाई सुरू असतानाच चीनमुळे लडाख सीमेवर तणाव वाढला आहे. हिंदुस्थानी लष्कराकडून केल्या जाणाऱया पेट्रोलिंग एरियाजवळ चीनने घुसखोरी केली आहे. हिंदुस्थाननेही जवानांची गस्त वाढविली आहे. आज ‘एलएसी’पासून 20 किलोमीटरवर मोल्डो येथे चर्चा झाली. हिंदुस्थानकडून चर्चेचे नेतृत्व 14व्या कोअरचे लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांनी केले. चीनकडून लेफ्टनंट जनरल शू किलिंग यांनी नेतृत्व केले. पाच तास दुपारी 4.30 पर्यंत चर्चा झाली, असे वृत्तवाहिन्यांनी म्हटले आहे. यापुढेही लष्करी अधिकाऱयांच्या पातळीवर चर्चा सुरू राहणार असून, ‘एलएसी’वर स्टॅण्डऑफ कायम आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

यापूर्वी 12 वेळा चर्चा मात्र तोडगा नाही

तणाव निवळण्यासाठी यापूर्वी दोन्ही बाजूच्या मेजर जनरल दर्जांच्या अधिकाऱयांमध्ये बारा वेळा चर्चा झाली. अनेक फेऱ्या झाल्या तरी तोडगा निघालेला नाही. दरम्यान, शुक्रवारी परराष्ट्र मंत्रालयाच्या संयुक्त सचिवांच्या पातळीवरही चर्चा झाली होती. चर्चेने तोडगा काढण्यावर एकमत झाल्याचे वृत्त आहे.

आपली प्रतिक्रिया द्या