देशातील मास्क निर्यातबंदीला उशीर का? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांचा हल्लाबोल

1007
rahul-gandhi

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर मास्कच्या निर्यातीवरून हल्लाबोल केला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने व्हेंटिलेटर्स आणि सर्जिकल मास्कसारखी पुरेशी जीवरक्षक उपकरणं राखून का ठेवली नाहीत? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच हा गुन्हेगारी कट तर नाही ना, असा संशयही त्यांनी ट्विटच्या माध्यमातून व्यक्त केला आहे.

याबाबतचा एक अहवाल शेअर करीत राहुल गांधी म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेने तीन आठवड्यांपूर्वीच व्हेंटिलेटर्स आणि सर्जिकल मास्कचा पुरेसा साठा करून ठेवण्याच्या सूचना केलेल्या असतानाही तीन आठवड्यांनंतर केंद्र सरकारने या उपकरणांच्या निर्यातीवर बंदी घातली. जनतेच्या जीवाशी केलेला हा खेळ कोणत्या ताकदीच्या जोरावर करण्यात आला? हा गुन्हेगारी कट नाही का? जागतिक आरोग्य संघटनेने 27 फेब्रुवारी रोजी सर्व देशांसाठी काही मार्गदर्शक तत्त्वे प्रसिद्ध केली होती. यामध्ये म्हटले होते की, सध्या जगातील कोरोनाच्या प्रादुर्भावाची परिस्थिती पाहता मेडिकल मास्क आणि व्हेंटिलेटर्सची कमतरता आहे. त्याचबरोबर सर्जिकल गाऊन आणि गॉगल्सचा लवकरच तुटवडा भासणार आहे. कोरोनाच्या रुग्णांमुळेच नाही, तर या आजाराच्या भीतीमुळेही या गोष्टींची मागणी वाढू शकते. त्यामुळे जगभरात या वस्तूंची कमतरता भासू शकते, असे राहुल गांधी यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. जेव्हा मोदींनी जनता कफ्र्यूची घोषणा केली होती, त्यानंतर दुसऱ्याच दिवशी केंद्र सरकारने मास्कच्या निर्यातीवर 19 मार्च रोजी बंदी घातली होती.

आपली प्रतिक्रिया द्या