बांगलादेशातील हिंसाराचा विमानसेवेवर परिणाम; इंडिगो आणि एअर इंडियाकडून हिंदुस्थान ते ढाका उड्डाने रद्द

सरकारी नोकरीतील आरक्षणावरुन गेला महिनाभर बांगलादेशात हिंसाचार उफाळला आहे. या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर इंडिगो आणि एअर इंडिया या विमान कंपन्यांनी हिंदुस्थान ते ढाका आणि ढाका ते हिंदुस्थान उड्डाने रद्द केली आहेत.

एअर इंडियाने सोशल प्लॅटफॉर्म X वर एक पोस्ट केली आहे. “बांग्लादेशमधील उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेता, हिंदुस्थान ते ढाका आणि ढाका ते हिंदुस्थान विमानांची नियोजित उड्डाने त्वरित रद्द केली आहेत”, असे एअर इंडियाने पोस्टमध्ये म्हटले आहे.

“बांगलादेशातील परिस्थितीवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. हिंदुस्थान ते ढाका आणि ढाका ते हिंदुस्थान प्रवासासाठी पुष्टी केलेल्या बुकिंगसह रीशेड्युलिंग आणि बुकिंग रद्द करण्याच्या शुल्कावर सूट देत आहोत. प्रवासी आणि कर्मचारी यांच्या सुरक्षेला आमचे सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे. अधिक माहितीसाठी आमच्या 24/7 संपर्क केंद्रावर 011-69329333 / 011-69329999 वर कॉल करा,” असेही एअर इंडियाने पुढे नमूद केले आहे.

देशातील निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीनंतर बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा दिला आहे. राजीनाम्यानंतर त्या देशातून पळून गेल्याने बांगलादेश गंभीर राजकीय संकटात सापडला आहे.