
हिंदुस्थानी लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी छावण्यांवर हवाई हल्ले केले. हे हल्ले झाल्यानंतर काही तासांतच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल इतर देशांच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांसमवेत चर्चा केली. असे वृत्तसंस्था पीटीआयने अधिकाऱ्यांच्या हवाल्याने वृ्त्त दिले आहे. यावेळी त्यांनी सांगितले की, हिंदुस्थानकडून तणाव वाढवण्याचा कोणताही हेतू नाही, परंतु पाकिस्तानने असे केले तर हिंदुस्थान ‘कडक प्रत्युत्तर’ देण्यास तयार आहे. अजित डोवाल यांचे हे संकेत हिंदुस्थानची मनःस्थिती आणि एकूणच युद्धाची तयारी याचे संकेत देत आहेत.
अजित डोवाल यांनी अमेरिका, ब्रिटन, सौदी अरेबिया आणि जपानमधील त्यांच्या समकक्षांना पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी पायाभूत सुविधांवर भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांबद्दल माहिती दिली. हिंदुस्थानचा तणाव वाढवण्याचा कोणताही हेतू नाही परंतु जर पाकिस्तानने तसे करण्याचा निर्णय घेतला तर तो जोरदार प्रत्युत्तर देण्यास पूर्णपणे तयार आहे असेही डोवाल यांनी म्हटले आहे.
‘जर तणाव वाढवण्याचा प्रयत्न झाला तर आम्ही प्रत्युत्तर देण्यास तयार आहोत’ वृत्तसंस्था पीटीआयनुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘एनएसएने त्यांच्या समकक्षांना कारवाई आणि ती कशी राबवायची याबद्दल माहिती दिली. हा दृष्टिकोन अतिशय नियंत्रित आणि संयमी होता. त्यांनी यावर भर दिला की, हिंदुस्थानचा तणाव वाढवण्याचा कोणताही हेतू नाही. परंतु जर पाकिस्तानने तसे करण्याचा निर्णय घेतला तर योग्य पद्धतीने प्रत्युत्तर देण्यास ते पूर्णपणे तयार आहेत. डोवाल यांनी यूएस एनएसए आणि परराष्ट्र सचिव मार्को रुबियो, यूकेचे जोनाथन पॉवेल, सौदी अरेबियाचे मुसैद अल ऐबान, यूएईचे एचएच शेख तहनौन आणि जपानचे मसाताका ओकानो यांच्याशी चर्चा केली.
पहलगामला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आॅपरेशन सिंदूर राबवण्यात आले, या आॅपरेशनमार्फत पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे तळही उद्ध्वस्त करण्यात आले. म्हणूनच सध्याच्या घडीला हिंदुस्थान कठोर कारवाईसोबतच खबरदारी देखील घेताना दिसत आहे. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी सध्याच्या घडीला आता देशांतर्गत मोठे निर्णय घेतले जात आहेत.