
शेवटच्या दोन सेकंदांत उरुग्वेने बरोबरी साधली, पण हिंदुस्थानला हार पत्करायचीच नव्हती. एफआयएच हॉकी ज्युनियर महिला विश्वचषकातील 9/12 पात्रता फेरीत निर्धार, संयम आणि कौशल्याच्या बळावर हिंदुस्थानने उरुग्वेला शूटआऊटमध्ये 3-1 ने नमवत मैदानात आपली ताकद सिद्ध केली.
सामन्याच्या पहिल्याच मिनिटापासून हिंदुस्थानने चेंडूवर हुकूमत गाजवली. सततचा दबाव, सर्कलमध्ये घुसखोरी आणि वेधक आक्रमण उरुग्वेचा बचाव पुरता ढासळू लागला. 19व्या मिनिटाला मनीषाने विजेसारखा शॉट मारत हिंदुस्थानला 1-0 अशी आघाडी दिली आणि पहिल्या हाफमध्ये हिंदुस्थानने आपला हल्ला आणखी प्रखर केला.
दुसऱ्या हाफमध्येही हिंदुस्थानचाच धाक
तिसऱया क्वॉर्टरमध्ये उरुग्वेचे दोन पेनल्टी कॉर्नर निष्फळ ठरले, तर अखेरच्या क्वॉर्टरमध्ये गोलरक्षक निधी भिंतीसारखी उभी राहिली. 49 व्या मिनिटाला तिने केलेला अफलातून बचाव निर्णायक ठरला. मात्र सामना संपायला फक्त दोन सेकंद असताना मिळालेल्या पेनल्टी स्ट्रोकवर जस्टिना अरगुईनने गोल करत सामना बरोबरीत ढकलला.
तणावाचा कडेलोट झाला आणि मग आले शूटआऊटचे रणांगण. हिंदुस्थानने थंड डोक्याने सामना खेळला. पूर्णिमा यादव, ईशिका आणि कनिकाने गोल करत विजयावर शिक्कामोर्तब केला, तर निधीने उरुग्वेचे दोन फटके रोखून विजयाचा किल्ला अभेद्य केला.
या जिगरबाज विजयासह हिंदुस्थान नवव्या/दहाव्या स्थानाच्या प्ले ऑफमध्ये दाखल झाला आहे. आता गुरुवारी अंतिम पात्रता फेरीच्या सामन्यात स्पेनविरुद्ध हिदुस्थान असा पुन्हा एकदा संघर्ष पाहायला मिळणार आहे.


























































