20 साल बाद…! हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाची फायनलमध्ये धडक

65

सामना ऑनलाईन । जकार्ता

जकार्तामध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानच्या महिला हॉकी संघाने इतिहास घडवला आहे. उपांत्यफेरीच्या सामन्यात तीन वेळचा विजेता चीनचा 1-0 असा पराभव करत हिंदुस्थानने अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. तब्बल 20 वर्षानंतर हिंदुस्थानचा महिला संघ आशियाई क्रीडा स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला असून यापूर्वी अशी कामगिरी 1998 ला बँकॉकमध्ये झालेल्या स्पर्धेत नोंदवण्यात आली होती. सामन्यातील एकमात्र विजयी गोल हिंदुस्थानच्या गुरजीत कौर हिने 52 व्या मिनिटाला केला.

आशियाई क्रीडा स्पर्धेत महिला हॉकीचा समावेश 1982 ला करण्यात आला होता आणि त्याच वेळी हिंदुस्थानने आपले पहिले सुवर्णपदक जिंकले होते. परंतु त्यानंतर सुवर्णपदकाने हिंदुस्थानला नेहमीच हुलकावणी दिली आहे. परंतु यंदा सुवर्णपदक जिंकायचेच हा निर्धार घेऊन मैदानात उतरलेल्या महिला रणरागिणींनी चिनी आक्रमण परतवून लावले. सामन्यातील अखेरच्या क्वार्टरमध्ये हिंदुस्थानला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर गुरजीतने गोल करत खाते उघडले आणि हाच विजयी गोल ठरला.

आपली प्रतिक्रिया द्या