
गटफेरीत चीन, जपान आणि कझाकिस्तान यांना नमवित विजयाची हॅट्ट्रिक साजरी करणाऱया यजमान हिंदुस्थानला आशिया चषक हॉकी स्पर्धेत जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे, मात्र उद्यापासून (दि. 3) सुरू होत असलेल्या सुपर-4 फेरीच्या थरारात हिंदुस्थानपुढे पाच वेळचा विजेता आणि विद्यमान चॅम्पियन असलेल्या दक्षिण कोरियाचे आव्हान असेल.
हिंदुस्थानने ‘अ’ गटात चीनवर 4-3, जपानवर 3-2, तर कझाकिस्तानवर 15-0 गोलफरकाने विजय मिळविले होते. कोरियाची स्थिती मात्र फारशी चांगली नाही. ‘ब’ गटातून मलेशियानंतर हा संघ दुसऱया स्थानावर राहिला. मलेशियाने त्यांना 4-1 ने हरवले होते. त्यामुळे कोरियाला आता सुपर-4 मध्ये नवी सुरुवात करावी लागणार आहे. कझाकिस्तानविरुद्ध हिंदुस्थानी खेळाडूंनी दमदार प्रदर्शन केले. प्रखर उष्णता आणि उकाडय़ातही संघाने आक्रमणापासून बचावापर्यंत सर्वच विभागांत भक्कम खेळ केला. अभिषेकने चार गोल केले, तर सुखजीत सिंगने हॅट्ट्रिक ठोकली, मात्र दिलप्रीत सिंग फॉरवर्ड लाइनमधील कमकुवत दुवा ठरला. त्याने एक गोल केला असला तरी अनेक सोप्या संधीही गमावल्या, हे विसरता येणार नाही.
मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली मधल्या फळीने गटफेरीत उत्तम खेळ केला, तर कर्णधार हरमनप्रीत सिंगने डिफेन्समध्ये चोखपणे जबाबदारी पार पाडली. गोलरक्षक कृशन बहादूर पाठकनेही पहिल्या दोन लढतींत सरासरी कामगिरी केल्यानंतर कझाकिस्तानविरुद्ध चमकदार बचाव केला. त्यामुळे दक्षिण कोरियाविरुद्ध या खेळाडूंना आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करावी लागणार आहे.
सुपर-4 टप्प्यात हिंदुस्थान, कोरिया, चीन आणि मलेशिया हे संघ परस्परांविरुद्ध खेळतील. त्यातील अव्वल दोन संघ रविवारी अंतिम फेरीत भिडतील. आशियाई कप जिंकणाऱ्या संघाला 14 ते 30 ऑगस्टदरम्यान बेल्जियम-नेदरलँड येथे होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये थेट प्रवेश मिळणार आहे. सुपर-4 मधील दुसऱया सामन्यात मलेशियाचा सामना चीनशी होईल.
हिंदुस्थानी संघ – सूरज करकेरा, कृशन बी. पाठक (गोलरक्षक), हरमनप्रीत सिंग (कर्णधार), अमित रोहिदास, जरमनप्रीत सिंग, सुमित, संजय, जुगराज सिंग, मनप्रीत सिंग, विवेक सागर प्रसाद, राजिंदर, राजकुमार पाल, हार्दिक सिंग, मनदीप सिंग, अभिषेक, सुखजीत सिंग, शिलानंद लाक्रा, दिलप्रीत सिंग.
कोरिया संघ – डी. अंग (गोलरक्षक), जिहुन यांग, चियोलियोन पार्क, जिनकांग रिम, डेन सोन, जुंगजुन ली (कर्णधार), जोंगसुक बाए, सियोग ओह, जेवोन सिम, सुंगह्युन बाएक, सूंग मिन बाए, जाएहान किम, जियोनहो जिन, हियोनहोंग किम, सियुंगवू ली, मिन सू चियोन, यूनहू कोंग, येसियुंग ली.