
“देशाचे परराष्ट्र धोरण पूर्णपणे कोलमडले असून, एनडीए सरकार राष्ट्रीय हिताऐवजी केवळ काही खासगी घटकांच्या हितासाठी धोरणे राबवत आहे,” असा घणाघाती आरोप बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे. पश्चिम आशियातील संकट आणि देशांतर्गत वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. माध्यमांशी संवाद साधताना ते असे म्हणाले आहेत.
तेजस्वी यादव म्हणाले की, हिंदुस्थान परराष्ट्र धोरण आज अशा वळणावर आले आहे जिथे शेजारील देशांशी असलेले संबंध बिघडत आहेत आणि जागतिक संघर्षाचा फटका थेट हिंदुस्थानच्या अर्थव्यवस्थेला बसत आहे. सरकारच्या खासगी हिताच्या धोरणांमुळेच आज सर्वसामान्यांना महागाईच्या दरीत ढकलले जात आहे. “परराष्ट्र धोरण हे देशाच्या सुरक्षिततेसाठी आणि प्रगतीसाठी असावे, पण सध्या ते केवळ काही मोजक्या उद्योगपतींच्या फायद्यासाठी वापरले जात आहे,” असेही ते म्हणाले.
देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी वाढ आणि एलपीजी सिलिंडरच्या किमतींवरून त्यांनी सरकारला धारेवर धरले. “सरकार सांगत आहे की साठा पुरेसा आहे, पण मग किमती का कमी होत नाहीत? जनतेच्या खिशातून पैसे काढून ठराविक लोकांचे खिसे भरण्याचे काम हे सरकार करत आहे,” अशी टीका यादव यांनी केली.

























































