हवाई दलात येणार आणखी 36 राफेल

405
rafel-deal

हवाई दलाची ताकद वाढवण्याचा निर्धार केलेल्या मोदी सरकारने प्रान्सकडून आणखी 36 राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीच्या राफेल विमान खरेदीवर विरोधकांनी भ्रष्टाचाराच्या आरोपांचे शिंतोडे उडवले, मात्र त्याची पर्वा न करता सरकारने आणखी 36 राफेल विमाने हवाई दलाच्या ताफ्यात आणण्यासाठी पाऊल टाकले आहे. सरकारने या खरेदी व्यवहाराला अंतिम स्वरूप दिले आहे.

याआधीच्या 36 राफेल विमानांच्या खरेदीवरून काँग्रेसने सरकारवर वारेमाप टीका केली होती. किंबहुना, विरोधकांनी सरकारला सर्वोच्च न्यायालयात खेचले होते. या पहिल्या विमान खरेदीवरून उद्भवलेल्या वादाची पर्वा न करता सरकारने फ्रान्सकडून आणखी 36 विमाने खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच ही विमाने खरेदी करण्यासाठी ऑर्डर दिली जाणार आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे प्रान्स दौऱ्यादरम्यान 8 ऑक्टोबरला यासंबंधी औपचारिकता पूर्ण करणार आहेत.

राफेल विमानांची संख्या 72 जाणार

हवाई दलातील राफेल विमानांची संख्या 72 होणार आहे. सरकार आधीच फ्रान्सच्या दासौ एव्हिएशन कंपनीकडून 36 राफेल विमाने खरेदी करत असून त्यातील पहिले विमान अलीकडेच हिंदुस्थानकडे सोपवले आहे. या विमानांमुळे हवाई दलाची ताकद वाढणार आहे.

अमेरिकेला नकार, रशियाला होकार

अमेरिका हिंदुस्थानवर ‘लॉकहीड मार्टिन’कडून लढाऊ विमान खरेदी करण्यासाठी दबाव टाकत आहे, परंतु बालाकोटनंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी एफ-16 विमान पाडल्यानंतर अमेरिकेच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला होता. हिंदुस्थानच्या हवाई दलाने अमेरिकेकडून एफ-21 विमान खरेदी करण्यासही स्वारस्य दाखवलेले नाही. रशियाकडून मात्र 21 मिग-29 आणि 18 सुखोई-30 एमकेआय विमाने खरेदी करण्यास हिंदुस्थान राजी झाला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या