हिंदुस्थानच्या आर्थिक विकासाला हुडहुडी! जीडीपीचा ‘पारा’ 13.5 टक्क्यांवरून 6.3 पर्यंत घसरला

केंद्र सरकारकडून विकासाची कितीही हवा भरली जात असली आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन अनेक दावे करीत असल्या तरी प्रत्यक्षात हिंदुस्थानच्या आर्थिक विकासालाच ‘हुडहुडी’ भरली असून, जीडीपीचा ‘पारा’ निम्म्याने घसरला आहे. चालू आर्थिक वर्षात 2022-23 मध्ये दुसऱया तिमाहीत आर्थिक विकास दर 6.3 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. पहिल्या तिमाहीत हाच विकासदर 13.5 टक्के होता.

केंद्राच्या राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने बुधवारी 2022-23 च्या दुसऱया तिमाहीतील (जुलै ते सप्टेंबर) जीडीपीची आकडेवारी जाहीर केली. यात विकासदराची घसरण पाहता देशाची आर्थिक स्थिती चिंता वाढवणारी आहे. दुसऱया तिमाहीत देश कोरोना निर्बंधमुक्त असतानाही विकासाचा वेग प्रचंड मंदावला आहे. पहिल्या तिमाहीत (एप्रिल ते जून) जीडीपी 13.5 टक्के होता. त्यानंतरच्या दुसऱया तिमाहीत (जुलै ते सप्टेंबर) हा दर 6.3 टक्के झाला आहे.

विविध रेटिंग संस्थांनी जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत जीडीपी दराबाबत वर्तविलेले अंदाज काही प्रमाणात खरे ठरले आहेत. स्टेट बँकेने 5.8 तर रिझर्व्ह बँकेने 6.1 ते 6.3 टक्के जीडीपी राहील असा अंदाज वर्तविला होता.

आठ प्रमुख उद्योगांचा विकासदर नीचांकी पातळीवर

केंद्र सरकारच्या या आकडेवारीनुसार जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत हॉटेल, वाहतूक, ट्रेड आणि ब्रॉडकास्टिंग या क्षेत्राच्या विकासदरात 14.7 टक्क्यांची वाढ झाली. मात्र, इतर क्षेत्रात प्रचंड घसरण पाहायला मिळाली आहे.

देशातील प्रमुख आठ उद्योगांचा विकासदर ऑक्टोबर महिन्यात अवघा 0.1 टक्का इतका आहे. हा गेल्या 20 महिन्यातील नीचांकी दर आहे. यामध्ये कच्चे तेल, नैसर्गिक गॅस, सिमेंट आणि रिफायनरी उत्पादन उद्योगाच्या विकासदरात प्रचंड घट झाली. विशेष म्हणजे गेल्या महिन्यात सप्टेंबरमध्ये या आठ प्रमुख उद्योगांचा विकास दर 7.7 टक्के होता. कोरोना काळात ऑक्टोबर 2021 मध्ये हा दर 8.7 टक्के होता.