प्लॅस्टिक कचरा पर्यावरणाला खूप घातक आहे. प्लॅस्टिकचा वापर टाळा असे आवाहन करूनही परिस्थितीत सुधार होताना दिसत नाही. त्यातही अतिशय लाजीरवाणी बाब म्हणजे प्लॅस्टिक कचराच्या निर्मिती करण्यात जगभरात आपला देश आघाडीवर आहे. हिंदुस्थानात दरवर्षी एक कोटी दोन लाख टन कचरा तयार होतोय.
ब्रिटनच्या लीड्स विद्यापीठाच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार, जगभरात दरवर्षी पाच कोटी 70 लाख टन प्लॅस्टिक कचरा तयार होतो. त्यापैकी दोन-तृतीयांश कचऱयाची निर्मिती अल्प विकसित आणि विकसनशील देशांमधून होतेय. जो कचरा खुल्या जागेत टाकला जातो, त्याचा अभ्यास संशोधकांनी केला. हा कचरा गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्यास अपयश येत असल्याचे अभ्यासातून अधोरेखित झालंय.
दिल्ली, लुआंडा, अंगोला, कराची, अल काहिरा (मिस्त्र) ही सर्वाधिक प्लॅस्टिक प्रदूषण करणारी शहरे आहेत. नायजेरियाच्या लागोस शहरातदेखील जास्त प्रमाणात कचऱयाची निर्मिती होतेय.
हिंदुस्थान तर प्लॅस्टिक प्रदूषण करण्यात सर्वात पुढे आहे. दरवर्षी एक कोटी दोन लाख टन प्लॅस्टिक कचरा तयार होतो. हे कचऱयाचे प्रमाण नायजेरिया आणि इंडोनेशियापेक्षा दुपट्टीने जास्त आहे. याबाबत चीन चौथ्या स्थानावर आहे. त्याखालोखाल पाकिस्तान, बांगलादेश, रशिया आणि ब्राझील आहे.
अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आलाय की, जगभरातील निम्म्यापेक्षा अधिक प्लॅस्टिक प्रदूषणाला आठ देश जबाबदार आहेत.
अमेरिकेत वर्षाला 52 हजार टन
प्लॅस्टिकचा कचरा तयार होतो. तर ब्रिटनमध्ये 5100 टन कचऱयाची निर्मिती होते.