लॉकडाऊन संपण्याची आस, 30 ते 50 टक्के कामगारांतही व्यवसाय सुरु करण्यास उद्योग जगत तयार

1424

कोरोना महामारीमुळे ठप्प झालेले उद्योग चक्र पुन्हा सुरु करण्यासाठी हिंदुस्थानी उद्योग जगत अतिशय आतुर झालेले दिसत आहे. किमान सव्वा महिन्यानंतर तरी कोरोनाचा लॉकडाऊन संपेल अशी आस उद्योगपतींना लागली आहे. कामगारांच्या हाताला काम मिळावे आणि थांबलेले व्यवसाय पुन्हा सुरु व्हावे यासाठी 30 ते 50 टक्के कामगार घेऊन आपले उद्योग सुरु करण्याची तयारी उद्योजकांनी केंद्र सरकारकडे बोलून दाखवली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विभिन्न राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये कोरोना लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणण्याचे संकेत नुकतेच दिले आहेत. त्यामुळे लवकरच काही भागांतील आपले उद्योग सुरु करण्याची उद्योजकांची आशा पल्लवित झाली आहे. आता ते केंद्राच्या आणि राज्यांच्या विविध मंत्रालयांच्या परवानगीची प्रतीक्षा करीत आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ‘जान भी और जहान भी’ हा संदेश देत काही भागातील उद्योग सुरु करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळेच फिक्की आणि सीआयआय या उद्योजकांच्या संघटनांनी पुन्हा देशातील आपले उद्योग सुरु करण्यासाठी सरकारशी चर्चा सुरु केली आहे.

ग्रीन झोनमध्ये 50 तर ऑरेंज झोनमध्ये 30 टक्के कामगारांसह काम सुरु करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाला रोखण्यासाठी देशात अमलात आणलेला लॉकडाऊन बहुतांशी यशस्वी झाला आहे अशी भावना उद्योजकांत आहे. आता देशात थांबलेले उद्योगचक्र सुरु करण्यासाठीची सशर्त तयारी व्यावसायिकांनी दाखवली आहे. त्यानुसार कोरोनाग्रस्त ग्रीन विभागात 50 टक्के तर ऑरेंज विभागात 30 टक्के कामगार घेऊन आम्ही उद्योग सुरु करू इच्छितो असे उद्योजकांनी म्हटले आहे. शिवाय उद्योग सुरु करतांना काम करणाऱ्या कामगारांच्या आरोग्याची व स्वच्छतेची जबाबदारी स्वीकारण्याची तयारी या उद्योजकांनी दाखवली आहे.

10 ते 12 तासांच्या शिफ्टची परवानगी हवी
पीएचडी चेम्बर ऑफ कॉमर्स या संघटनेने सरकारकडे किमान 10 ते 12 तास कामाची परवानगी मागितली आहे. व्यवसायाचा गाडा रुळावर आणण्यासाठी आपल्याला 8 तासांऐवजी कामगारांकडून 10 ते 12 तास कंद घेण्याची परवानगी सरकारने द्यावी. त्यामुळे कमी कामगारांत जास्त उत्पादन काढता येईल अशी विनंती उद्योजकांच्या संघटनेने केंद्राकडे केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या