यंदा पाऊस चांगला होणार, हवामान खात्याचा अंदाज

1381

मान्सूनपूर्व पावसाने रविवारी आणि सोमवारी राज्यात दमदार हजेरी लावली आहे. याच पार्श्वभूमीवर, भारतीय हवामान खात्याने यंदा चांगला पाऊस होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे.

हवामान खात्याने नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. हवामानात न्युट्रल ईएनएसओ नावाची परिस्थिती निर्माण झाल्याने यंदा चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. नैर्ऋत्य मोसमी वारेही उत्तम स्थितीत आहेत. मात्र, पश्चिम किनारपट्टी भागात विशेषतः महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्ट्यांवर वादळ येण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांत ते कर्नाटक आणि गोवा किनारपट्टीवर येणार असून 3 जून रोजी हे वादळ महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीवर धडकणार आहे. त्यामुळे पश्चिम सागरी तटाजवळ मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या वादळामुळे 4 जून पर्यंत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा देण्यात आला आहे. तसंच, सखल भागात पाणी साचण्याचा इशारा देण्यात आला असून या वादळामुळे वीज आणि टेलिकॉम सेवांवरही परिणाम होणार आहे. या मान्सूनमध्ये खूप मुसळधार पावसाची शक्यता आहे असे काही संशोधनासमोर आले आहे पण हवामान विभागाची यावर संशोधन सुरू आहे, इतक्यात काही सांगता येणार नाही.

या वादळाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसण्याची शक्यता असून मुंबई, ठाणे, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. देशभरात चांगला पाऊस होणार असला तरी पश्चिम बंगाल आणि ओ़डिशा या राज्यांमध्ये कमी पाऊस असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या