
2036 सालच्या ऑलिम्पिक यजमानपदाच्या शर्यतीत मेक्सिको, कतार, इजिप्त, दक्षिण कोरिया आणि हिंदुस्थान हे पाच देश होते, पण आता मेक्सिकोने तीव्र स्पर्धा असल्यामुळे या शर्यतीतून माघार घेतली आहे. त्यामुळे हिंदुस्थानच्या यजमानपदाच्या मार्गातून एक अडथळा आपोआप दूर झाला आहे. त्यामुळे हिंदुस्थानला यजमानपदाच्या शर्यतीत बाजी मारण्यासाठी कतार आणि दक्षिण कोरिया या आशियाई देशांशीच संघर्ष करावा लागणार आहे.
आज मेक्सिकोच्या राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (सीओएम) अध्यक्षा मारिया जोस अल्काला यांनी ऑलिम्पिक यजमानपदासाठी शर्यत अधिक तीव्र झाल्यामुळे आपण या शर्यतीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. आता ते युवा ऑलिम्पिक खेळांच्या आयोजनावर आपले लक्ष केंद्रित करणार आहेत.
मेक्सिको ऑक्टोबर 2022 मध्ये ऑलिम्पिक यजमानपदाची इच्छा व्यक्त केली होती. माजी परराष्ट्रमंत्री मार्सेलो ऍबरार्ड यांनी सीओएमबरोबर 2036 च्या ऑलिम्पिक यजमानपदासाठी प्रयत्न सुरू केले होते. मेक्सिकोने 1968 साली ऑलिम्पिकचे यशस्वी आयोजन केले होते आणि पुन्हा एकदा त्यांना तो अनुभव घ्यायचा होता. पण यजमानपदासाठी सारेच उत्सुक असल्यामुळे मेक्सिको या शर्यतीत मागे पडू शकतो म्हणून आम्ही आमचे लक्ष युवा ऑलिम्पिक स्पर्धेवर केंद्रित केले असून त्या स्पर्धेच्या यजमानपदाची आम्हाला सुवर्णसंधी असल्याचे त्यांचे मत आहे. याबाबत आयओसीशी आमची सकारात्मक चर्चा सुरू आहे. युवा ऑलिम्पिकच्या माध्यमातून मेक्सिकोला जागतिक पातळीवर आपली ताकद दाखवण्याचीही संधी आहे. तसेच 2027 च्या पॅन अमेरिकन गेम्सवरही मेक्सिको आपली बोली लावणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
हिंदुस्थानसमोर जोरदार आव्हान
दक्षिण कोरियाने 1988 साली सेऊल शहरात ऑलिम्पिकचे आयोजन केले होते. त्यानंतर सातत्याने ते यजमानपदासाठी प्रयत्न करताहेत. मात्र 2018 साली त्यांना हिवाळी ऑलिम्पिकच्या आयोजनाची संधी मिळाली होती. यावेळीही ते जोरदार प्रयत्न करणार आहेत. 2022 साली फिफा वर्ल्ड कपचे अभूतपूर्व आयोजन करणाऱया कतारने आता आपले लक्ष 2036 च्या ऑलिम्पिक यजमानपदाकडे आपले लक्ष केंद्रित केले आहे. कतारनेही यजमानपदासाठी जोरदार तयारी सुरू केली असून हे दोन्ही आशियाई देश हिंदुस्थानसमोर कडवे आव्हान उभे करत आहेत. त्यामुळे या दोघांवर मात करून हिंदुस्थान यजमानपद कसे काबीज करतो याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.


























































